Published On : Tue, Oct 6th, 2020

अंबाझरीने वाजविली धोक्याची घंटा..

नागपूरचे भूषण असलेल्या अंबाझरी तलावांने धोक्याची घंटा वाजविली आहे. आयुष्य संपलेला हा तलाव जर फुटला तर अर्धे नागपूर जलमय होईल अशी अवस्था आज तरी या तलावाच्या पाळीची व त्याखालून वाहत असलेल्या पाण्याची पाहणी केली तर लक्षात येईल. अलीकडेच अतिवृष्टीमुळे आलेला पेंच नदी, वैनगंगा नदी, कन्हान नदीसह अनेक ठिकाणी आलेला महापूर. यात झालेले आर्थिक, भौतिक नुकसान पहाता ही वेळ, काळ सांगून येत नाही असेच म्हणावे लागेल. पूर हा अति पावसामुळे येत असला तरी पूर हाताळणे शेवटी मानवी कार्यच असते. अंबाझरी तलाव असलेल्या नाग नदीच्या पाणलोट क्षेत्रातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची आवक (इन्फ्लो) येत असते. हा या मध्यम आकाराच्या तलावात साठविला जातो. दरवर्षी पेक्षा यावर्षी सर्वच ठिकाणी पाऊस चांगला झाला. नागनदी पाणलोट क्षेत्रात जर थोडा जास्त पाऊस झालाच तर अधिच आयुष्य संपलेल्या या अंबाझरी तलावांचे भवित्व काय असेल हा विचारपूर्वक अभ्यास करायला लावणार गंभीर विषय आहे. चार वर्षा पासून या तलावांचे बळकटी करण्याविषयी चर्चाच चालू आहे. कागद पत्रावर होत असलेल्या अंबाझरी तलावांच्या बळकटी करण्याबाबत प्रत्यक्षात कधी काम याकडे जीव मुठीत घेवून पश्चिम नागपूरकरांचे डोळे लागले आहेत.

अंबाझरी तलाव पश्चिम नागपूराचे वैभव आहे. नागपूर शहरातील ११ तलावांपैकी हा एक महत्वाचा व मोठा तलाव आहे. नागपूरातून वाहणारी नाग नदी या तलावातून उगम पावते. या तलावांचा पूर्व इतिहास सांगतो की गोंड राजाच्या काळात या तलावाची निर्मिती झाली. लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोगरातून उगम पावलेल्या या नाग नदीवर छोटासा बंधारा बांधून पिण्याच्या पाण्याची सोय त्यावेळेस करण्यात आली होती. उत्तर भारतातून नागपुरात कामासाठी आलेल्या कोहळी समाजाच्या लोकांनी हा तलाव निर्माण केल्याची नोंद आहे. भोसले राजाच्या काळात या तलावात सुधारणा करून या तलावाच्या वैभवात भर टाकण्यात आली होती. सन १८६९ या साली पडलेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याकरीता अंबाझरी तलावांचे स्वरूप मोठे करण्यात आले. १८७० साली नागपुरात नगर पालीका अस्तित्वात आली आणि या तलावाची मालकी पालिकेकडे गेली. ४०-५० वर्षे यांच तलावातून नागपूरच्या काही भागांत पाणी पुरवठा होत असे.

आज नागपूरचे वैभव असलेला अंबाझरी तलाव संकटात सापडला आहे. खरंच एखादा तलाव संकटात सापडला म्हणजे काय. संकट तलावावर का आले तर त्यांची अनेक कारणे असू शकतील. त्यातले एक कारण मेट्रोचे असू शकेल. मेट्रो ही नागपूरसाठी आनंदाची बाब असली तरी या मेट्रो रेल्वेचे १४ पिलर्स अंबाझरी तलावासाठी डोकेदुखी ठरणार तर नाही ना. या पीलर्समुळे, मेट्रोच्या कंपनामुळे अंबाझरी तलावाला काही अघात होणार तर नाही ना. जर दुर्घटना झाली तर काय परीणाम भोगावे लागतील. या भीतीने नागपूरकर भयभीत आहेत. याकरीता अभ्यास झालेत. काही उपाय योजना सूचविण्यात आल्यात.


या उपाय योजना नुसार धोका होणार नाही हे पण सांगण्यात आले. चार वर्ष झालेत या तलावांचे भाग्य काही अजून उजळले नाही. चार वर्षात कागदांपलीकडे मेट्रो, महानगरपालिका व जलसंपदा पुढे सरकलेच नाही. तिन तिघाडा अन काम बिघाडा म्हणतात तसे तर नाही ना. मालकी एकाची, पैसा दुस-याचा आणि काम करणारे तिसरेच. अंबाझरीची मालकी महानगर पालिकेकडे आहे तर मेट्रो पैसे देणार आहे, तर या तलावांचे बळकटीकरण करणार म्हणजे बांधकाम जबाबदारी असणार जलसंपदा कडे. त्यामुळेच वेळ तर लागत नाही ना. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड महाराष्ट्राने जवळपास ५०००- ६००० कोटीची बांधकाम कामे चार वर्षात पूर्ण केलीत पण १०-२० कोटीचा अंबाझरी तलाव बळकटीकरण व सुशोभिकरण कोणालाही पूर्ण करता आले नाही हे दुर्दैव.

सन २०१६ पासून यावर अभ्यास चालू आहे. २०१८ मध्ये ठरल्यानुसार अंबाझरी तलावाचे बळकटीकरण करून सुरक्षेबाबत काही उपाय योजना आमंलात आणाव्यात त्यापैकी पावसाळ्यात पूराचे पाणी जास्तीत जास्त वेगाने नागनदी निर्मित नाल्यातून जाण्याबाबत नागपूर महानगरपालिकेला सांडव्या खालील भागांचे काम करायचे होते. नागपूर शहरात अनेक ठिकाणी ही नागनदी राहीली नसून नाला झाला आहे तर काही ठिकाणी नाला म्हणायलाही मन धजायला तयार नाही. या नागनदीवर जे अतिक्रमण झालेले आहे ते अतिक्रमण काढायला राजकीय इच्छा शक्तीची आवश्यक्ता नागपूरात अजून तरी उदयाला आलेली दिसत नाही. महानगर पालीकेच्या नोव्हेंबर २०१६ च्या पत्रानुसार नागपूर महानगरपालिकेने नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशनला नाहरकत देण्यास हरकत नाही असे महासंचालक, संकलन, प्रशिक्षण, जल विज्ञान, संशोधन व सुरक्षितता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, मेरी, नाशिक यांनी १६ ॲागस्ट २०१७ नुसार महानगरपालिकेला सात मुद्द्यांनद्वारे उपायोजना सहित कळविले होते. यासाठी सुद्धा तीन वर्ष लोटल्यावर या धरणाच्या सुरक्षिततेविषयी व नागपूरकरांच्या जिविता विषयी अजून पर्यंत काहीही ठोस बांधकामाला सुरुवात झालेली दिसत नाही. कागदोपत्रीचा हा चेंडू, या विभाग कडून त्या विभागाकडे आणि त्या विभागाकडून या विभागाकडे, या पलीकडे पोचलेला नाही. अंबाझरी ने धोक्याची घंटा वाजविली आहे. ही वाजलेली घंटा वेळीच लक्ष देऊन थांबवली नाही तर ती कोणा कोणाच्या गळ्यात वाजेल हे भविष्यात समजेल. त्यासाठी अनेकांचे जीवनाशी खेळण्याचा अधिकार या तिन्ही एजन्सीजला मुळीच नाही.

अंबाझरी तलावांने धोक्यांची घंटा वाजविली. ही घंट्टा अनेकांनी ऐकली. हा आवाज नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी पण ऐकला. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून तलावांच्या सुरक्षिते विषयी मार्गदर्शन केले. स्टोन दगडाचे पीचींग, सौंदर्यीकरण, सुशोभीकरण सोबतच बळकटीकरण करून नागपूरकरांना या संकटातून वाचवण्याचे सूचना केल्यात. यात महत्वाचे म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने सुध्दा मार्च २०१८ रोजी उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले होते. पण भिजत पडलेले घोगडे अजून तसेच आहे. दीडशे वर्षे सतत नागपूरकरांना आकर्षण ठरलेला हा अंबाझरी तलाव आज मात्र संकट घेऊन उभा आहे. या तलावाचे बळकटीकरण करून नागपूरकरांचे त्यातल्या त्यात पश्चिम नागपूरकरांवरचे भविष्यातले मोठे संकट टाळावे, एवढीच अपेक्षा….( अपूर्ण)

– प्रवीण महाजन,जल अभ्यासक,नागपूर