Published On : Mon, Jun 18th, 2018

‘अकोला-खंडवा’ रेल्वे मार्गाच्या ब्रॉड गेजचा मार्ग सुकर; उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय वनविभागाकडून मंजुरी

नवी दिल्ली : दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजवरुन ब्रॉड गेज रुपांतरास ‘वन संवर्धन कायद्याची’ परवानगी मिळाली आहे. या मार्गाच्या गेज रुपांतरामुळे नऊ राज्य जोडली जाणार आहेत.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन भवन येथे रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय वने व पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत ‘अकोला-खंडवा’ रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या ‘अकोला- खंडवा’ रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरणासाठी ‘वन सवंर्धन कायद्यानुसार’ परवानगी देण्याचा निर्णय झाला .

Advertisement

अकोट ते आमला खुर्द ब्रॉडगेजचे काम लवकरच सुरु होणार – खासदार संजय धोत्रे

वन सवंर्धन कायदा १९८० अस्तित्वात येण्यापूर्वीच ‘अकोला- खंडवा’ हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्याने या कायद्यातून रेल्वे मार्गाला वगळण्यात आले आहे व गेज रुपांतरणास मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी बैठकीनंतर दिली. आजच्या मंजुरीमुळे वन संवर्धन कायद्याअंतर्गत परवानगी न मिळाल्याने बंद पडलेल्या ‘अकोट ते आमला खुर्द’ या गेज रुपांतरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याचेही श्री. धोत्रे यांनी सांगितले. लवकरच या मार्गावरील गेज रुपांतरणाच्या कामास सुरुवात होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .

अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरास सुरुवात झाली असून सध्या अकोला-अकोट मार्गाच्या गेज रुपांतरणाचे काम सुरु आहे. मात्र, पुढे अकोट ते खंडवा मार्गावरील ‘अकोट ते आमला खुर्द’ हा भाग अमरावती व अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज रुपांतरणासाठी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी न मिळाल्याने अकोट ते आमला खुर्द हे गेज परिवर्तनाचे काम रखडले होते, असेही श्री. धोत्रे यांनी सांगितले.

दीड ते दोन वर्षात गेज रुपांतरणाचे काम होणार पूर्ण
अकोला ते खंडवा गेज रुपांतरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आजच्या मंजुरीमुळे या मार्गाच्या गेज रुपांतरणाच्या कामास गती येऊन दीड ते दोन वर्षात ते पूर्ण होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्ष २००८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात ‘अकोला- खंडवा-रतलाम’ या ४७२ कि.मी. रेल्वे मार्गाच्या मीटर गेजहून ब्रॉडगेज अशा गेज रूपांतरणास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार रतलाम ते खंडवा रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन झाले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने या मार्गाच्या गेज रुपांतरणाच्या कार्यास मंजुरी दिली असून यासाठी जवळपास १४२१ कोटी रुपये खर्च येणार आहे.

गेज रुपांतरणामुळे ९ राज्य जोडली जाणार
अकोला–खंडवा रेल्वे मार्गाचे गेज रुपांतरण झाल्यावर हा रेल्वे मार्ग देशाच्या दक्षिण व उत्तरेतील राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करेल. या मार्गामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश , तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक ही राज्य जोडली जाणार आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement