Published On : Thu, Aug 8th, 2019

अखिल माळी समाजाचे महाधिवेशन समजाच्या समस्यांचा लोकजागर

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

नागपूर : महात्मा फुले शैक्षणिक संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त अखिल माळी समजाचे महाअधिवेशन 16 सप्टेंबरला रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहात घेण्यात येणार आहे. यानिमित्ताने माळी समाजाच्या समस्यांचा लोकजागर केला जाणार आहे.

अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना प्रामुख्याने निमंत्रित करण्यात आले आहेत. समाजाचे मंत्री, आमदार तसेच वेगवेगळ्या हुद्यावर असलेले अधिकारी, समाजसेवक यांनाही पाचारण करण्यात आले आहे. अधिवेशनात राज्यभरातून माळी समाजाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

महात्मा फुले शैक्षणिक संस्थेने साठव्या वर्षात पदार्पण केले आहे. आज संस्थेची रेशीमबाग येथे भव्य वास्तू उभी आहे. वाचानलय चालविले जात आहे. संस्थेच्या माध्यामतून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. हीरक महोत्स्वाच्या निमित्ताने

समाजबांधवांना एकत्रित केले जाणार आहे. माळी समाज मोठ्या प्रमाणात शेती करतो. तो अजूनही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासला आहे. राजकीयदृष्ट्याही उपेक्षित आहे. महाराष्ट्रात ओबीसीमध्ये कुणबी, तेली समाजानांतर माळी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. समाज फारसा संघटित
नसल्याने कुठलाच राजकीय पक्ष या समाजाची फारशी दखल घेताना दिसत नाही. त्याला अपेक्षित धरल्या जाते. सत्तेतही फक्त तोंडी लावण्यापुरता वाटा दिला जातो.

अधिवेशनाच्या निमित्ताने यासह समाजातील आर्थिक, शैक्षणिक तसेच विविध प्रश्‍नांवर उहापोह करण्यात येणार आहे. याकरिता 15 सप्टेंबरला महात्मा फुले सभागृहात समाजाच्या प्रतिनिधींचे खुले अधिवेशनसुद्धा घेण्यात येणार आहे.

अधिवेशनात महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे भारत रत्न द्यावे, महात्मा फुले यांच्या वाड्याचा जीर्णोधार करावा, समाजाच्या विकासासाठी सरकारणे सर्वांगीण धोरण आखावे, संत्रा उत्पादक व शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, राजकीय सत्तेत वाटा द्यावा आदी मागण्या सरकाराकडे केल्या जाणार आहेत. अधिवेशनाला राज्यभरातून पाच ते सात हजार समाजबांधव सहभागी होतील अपेक्षा आहे.