Published On : Thu, Dec 13th, 2018

नागपूरच्या अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा मिळाला, सुविधा कधी?

Advertisement

नागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात चार वर्षांपूर्वी अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन अजनी रेल्वेस्थानकाचे नाव भारतीय रेल्वेच्या नकाशात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर अजनी रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा पालटण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली. परंतु केवळ सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन रेल्वे प्रशासन गप्प बसले आहे. प्रत्यक्षात अजनीवरून एकच रेल्वेगाडी सोडण्यात येत असून अजनी रेल्वेस्थानकाचा विकास करण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर दिवसाकाठी ४० ते ४५ हजार प्रवाशांची वर्दळ असते. इतक्या मोठ्या प्रमाणावर नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे येथे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. यात अजनी रेल्वेस्थानकावर आणखी दोन प्लॅटफार्म वाढविण्याची रेल्वे प्रशासनाची योजना होती. अजनी रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मची संख्या वाढली असती तर येथून नव्या गाड्या सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला असता.

परंतु सॅटेलाईट टर्मिनलच्या घोषणेनंतर एकही नवा प्लॅटफार्म तयार करण्यात आला नाही. यामुळे सद्यस्थितीत अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस वगळता एकही गाडी अजनीवरून सोडण्यात येत नसल्याची स्थिती आहे. दक्षिण नागपुरातील नागरिकांना अजनी रेल्वेस्थानक सोयीचे आहे. त्यामुळे अजनीचा सॅटेलाईट टर्मिनलच्या रुपाने विकास केल्यास नागपूर रेल्वेस्थानकाचा भार हलका होऊन प्रवाशांनाही सोयीचे होणार असून अजनी रेल्वेस्थानकाचा विकास करण्याची मागणी होत आहे.

गाड्यांना थांबे देण्याची गरज
अजनी रेल्वेस्थानकावर फक्त १४ रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात आला आहे. इतर गाड्या थेट नागपूर रेल्वेस्थानकावर थांबतात. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच गर्दीचे चित्र अनुभवावयास मिळते. याशिवाय पार्किंगसाठीही नागपूर स्थानकावर जागा अपुरी आहे. अजनीला रेल्वेगाड्यांचा थांबा दिल्यास नागपूर रेल्वेस्थानकावरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.

एस्क्लेटरअभावी गैरसोय
नागपूर रेल्वेस्थानकावर सर्वच प्लॅटफार्मवर एस्क्लेटर (स्वयंचलित पायऱ्या) लावण्यात येत आहेत. परंतु सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा देऊन अजनी रेल्वेस्थानकावर एकही एस्क्लेटर बसविण्यात आले नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना उंच असलेल्या फूट ओव्हरब्रीजवरून सामान घेऊन एका प्लॅटफार्मवरून दुसºया प्लॅटफार्मवर जावे लागत आहे. यात ज्येष्ठ प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे.

कशा मिळतील नव्या गाड्या ?
सॅटेलाईट टर्मिनलचा दर्जा दिल्यानंतर अजनी रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्मची संख्या वाढविण्याची गरज होती. प्लॅटफार्मची संख्या वाढली असती तर रेल्वे अर्थसंकल्पात अजनी रेल्वेस्थानकावरून गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असता. परंतु पुरेसे प्लॅटफार्मच नसल्यामुळे केवळ एकच गाडी अजनी स्थानकावरून सोडण्यात येत असून अजनीला नव्या गाड्या मिळण्याची अपेक्षा भंग झाली आहे.

अजनीचा विकास महत्त्वाचा
‘नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असून येथे पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. अजनीचा सॅटेलाईट टर्मिनलच्या रुपाने विकास झाल्यास नागपूर रेल्वेस्थानकावरील भार कमी होऊन प्रवाशांनाही सुविधा मिळतील. त्यामुळे अजनी रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.’