पुणे – महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी तसेच सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधून पूरग्रस्तांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा केली.
अजित पवार म्हणाले की, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना तातडीने ५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक कुटुंबाला ५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ, म्हणजे एकूण १० किलो धान्य पुरवण्यात येणार आहे. पाण्यामुळे नागरिकांचे धान्य भिजून नाश झाले असल्याने प्रशासनाने तात्पुरते उपाय म्हणून शाळा किंवा कार्यालयात आश्रय उपलब्ध करून दिला आहे.
प्रशासनाने युद्धपातळीवर घेतले उपाय-
अजित पवारांनी सांगितले की, पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी मिलिट्री, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रित काम केले आहे. अनेक नागरिकांना एअरलिफ्ट करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक अधिकारी रात्रंदिवस मदतकार्यात गुंतले असून, नागरिकांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
तरीही, उपमुख्यमंत्री यांनी मान्य केले की दिलेले १० किलो धान्य काही कुटुंबांसाठी पुरेसे नाही. त्यामुळे अधिक अन्नधान्य आणि आवश्यक मदत कशी पुरवता येईल, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा-
अजित पवारांनी सांगितले की, अतिवृष्टीग्रस्त भागांचा नुकताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दौरा करून आढावा घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीसाठी पत्र पाठवले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मदतीचे पत्र पाठवले गेले आहे.
पूरस्थितीवर तातडीने उपाय योजना सुरू आहेत, पण केंद्राकडून मदत मिळाल्यास या संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पुन्हा मुसळधार पावसाचा धोका-
हवामान खात्याने २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अजित पवार यांनी सोलापूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा दौरा करून लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.