Published On : Sat, Sep 28th, 2019

शिखर बॅंकेच्या प्रकरणात पवारसाहेबांना नाहक अडकवण्याचा प्रयत्न झाला त्या उद्विग्नेतून राजीनामा दिला -अजित पवार

मुंबई : १ हजार ८८ कोटी रुपयांची शिखर बॅंकेत अनियमितता होती असा ठपका होता परंतु त्यात भ्रष्टाचार नाही असं असताना २५ हजार कोटीचा भ्रष्टाचार शिखर बॅंकेत झाला आणि त्यात अजित पवार यांचे नाव सतत चर्चेत ठेवून असं चित्र रंगवण्यात आले आणि त्यात पवारसाहेबांना नाहक गुंतवण्याचा प्रकार झाला त्या उद्विग्नेतून मी पदाचा राजीनामा दिला अशी स्पष्ट माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान चौकशा किती वर्ष चालवायच्या. याला काय लिमिट आहे की नाही.आम्हाला भावना आहेत की नाहीत असा संतप्त सवालही अजितदादा पवार यांनी यावेळी केला.

Advertisement

काल मी माझ्या सदसदविवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला. त्यातून माझ्या वरिष्ठांना वेदना झाल्या. मी त्यांना न विचारता राजीनामा दिला. मागेसुद्धा माझ्या बाबतीत असा प्रसंग झाला होता असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

माझ्यावर प्रसंग येतो त्यावेळी मी जयंत पाटील, छगन भुजबळ, आव्हाड, धनंजय यांना सांगायला पाहिजे होते. परंतु ते मी सांगितलं नाही ही माझी चुक होती की माहित नाही.
परंतु त्यामुळे माझ्या वरिष्ठ नेत्याच्या भावना दुखावल्या अशा शब्दात अजितदादा पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली.

तीन दिवसांपुर्वी मी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना फोन केला होता आणि तुमच्याकडे येणार आहे असं सांगितलं होतं. त्यावेळी माझ्या मनात असं केलं पाहिजे हे मनात आलं होतं असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

मात्र खरं कारण शिखर बॅंकेत काम करतोय, सर्व पक्षाचे लोक त्यामध्ये होते. बोर्डावर अ‍ॅक्शन घेण्यात आली. चौकशी सुरु आहे त्या खोलात जायचं नाही. १ हजार ८८ कोटीची अनियमितता आहे. मात्र २५ हजार कोटीचा घोटाळा झाला असं सांगितलं जात आहे मग बॅंक नफ्यात येईल का? कुणीही उठावं आणि किंमत टाकावी असंही अजितदादा पवार म्हणाले.

ही सर्व सहकारी बॅंकांची शिखर बॅंक आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखाना असेल किंवा सुत गिरण्या असतील त्यांना अडचणीत आऊट ऑफ वे मदत करावी लागते असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

विनय कोरे, पंकजा मुंडे, कल्याणराव काळे, यांच्यासह इतर चार कारखान्यांनाही राज्यसरकारने एनपीए असतानाही अशीच मदत केली आहे अशी माहितीही यावेळी अजितदादा पवार यांनी दिली.

कर्ज संपुर्ण फिटलेले आहे.२८५ कोटीचा नफाही झाला आहे. मग अशी अफरातफर होवू शकते का? अजून चौकशा पुर्ण व्हायच्या आहेत. त्यातच हे प्रकरण ईडीकडे देण्यात आले. यात पवारसाहेबांचा काडीमात्र संबंध नाही असं असताना त्याचं नाव गोवण्यात आले. अजित पवारांमुळे साहेबांना त्रास देण्यात येत होता. मी अतिशय अस्वस्थ झालो. त्यातून आपल्यामुळे साहेबांना बदनामी सहन करावी लागत आहे. त्यातून मी साहेबांना न सांगता. राजीनामा दिला. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना सांगायला हवे होते. माझी चुक झाली आहे. फोन बंद केला होता. माझ्या नातेवाईकांकडे होतो असे स्पष्टीकरणही अजितदादा पवार यांनी दिले.

निवडणुका आल्यावरच यांना या गोष्टी का आठवतात. ही २०११ ची घटना आहे. न्यायव्यवस्थेने समन्स काढले. कायद्याने त्यांना अधिकार आहे असेही अजितदादा पवार म्हणाले.

हरिभाऊ बागडे यांच्याकडे जावून राजीनामा मी मंजुर करुन घेतला. वैयक्तीक कारणातून राजीनामा दिला. ३० वर्ष राजकारण करतो आहे. मी बारामतीत पुरग्रस्त भागाचा दौरा केला.पुण्यात मुक्काम केला. आणि मग आज दुपारी साहेबांची भेट घेतली. परंतु मिडियामध्ये
असं चित्र रंगवलं. की मी बाहेर आहे.पवार परिवार हे मोठे कुटुंब आहे.पवारसाहेब सांगतील ते आम्ही ऐकतो. गृहकलह वगैरे काही नाही कशाला असं रंगवता असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.

पवारसाहेब हे घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत. मी आज त्यांना भेटलो. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या पत्रकार परिषद घे आणि सांग असं सांगितलं आहे.
काही इतर कारण नाही. गृहकलह नाही. आमच्या कुटुंबातील, घरातील काही गेले. मी त्यांच्यावर टिका केली नाही असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

उद्याच्या काळात मी निर्णय घेईन त्यावर तुला काम करायचं आहे हे पवारसाहेबांनी मला सांगितले त्याप्रमाणे मी काम करणार आहे. मी त्यांच्या नजरेला नजरही दिली नाही अशी स्पष्ट कबुलीही अजितदादा पवार यांनी दिली.

अजित पवार नाव नसतं तर ही केस पुढे आलीच नसती.परंतु अजित पवार आहे म्हणूनच हे प्रकरण वाढवण्यात आले. माझ्यासह भाजपाचे ही काही लोक यामध्ये आहेत. मात्र माझे नाव जास्त वापरुन माझीच बदनामी करण्यात येत आहे. या सगळ्या गोष्टींना तोंड देणं. मिडीयात येणार्‍या बातम्यांना तोंड देणं आणि त्यातच पवारसाहेबांनाही त्यात ओढण्यात आले त्यामुळे या गोष्टीचा भयंकर त्रास झाला असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आणि कालपासून मिडीयात सुरु असलेल्या चर्चांना पुर्णविराम दिला.

दरम्यान अजितदादा पवार बोलण्याअगोदर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामाबाबत माहिती दिली.

काल संध्याकाळी अजितदादा पवार यांनी राजीनामा दिला. त्याअगोदर ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका पवारसाहेबांनी घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली होती. मात्र
संध्याकाळी अजितदादा पवार यांच्या राजीनामा बातमी आली. मी ३० वर्षे काम करतोय, दादा स्पष्ट वक्ते आहेत. भावूक आहेत. पवारसाहेबांच्या बाबतीत घटना घडली. फोलपणा पाहिला. देशाच्या नेत्याला अशाप्रकारे या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते या गोष्टीने व्यथित होवून,पवारसाहेबांबद्दल असलेला जिव्हाळा, प्रेम आणि ते किती भावनाप्रधान आहेत याचा प्रत्यय काल आला असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. शिखर बॅंकेच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात भाजपाचे १७ जण आहेत, विलासराव जगताप, रावल सरकार आहेत. यांच्यासह अन्य लोक आहेत मग अजित पवार आणि २५ हजार कोटीचा भ्रष्टाचार असं सारखं येत असेल तर मग उद्विग्न होणारच आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले.

१ हजार ८८ कोटीची अनियमितता होती भ्रष्टाचार नाही. प्रसारमाध्यमांनी या सर्व प्रकरणाचा अभ्यास करावा आणि त्यावर भाष्य करावे अशी विनंती जयंत पाटील यांनी केली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement