मुंबई : रायगड येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शालवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. परंतु पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,असे अजित पवार ट्विटमध्ये म्हणाले.