Published On : Tue, Mar 9th, 2021

नेटीझन्स’ महिलांना ‘सुचिका`चे कवच !

सोशल मिडिया वॉरिअर्स तयार करणार : मार्गदर्शक पुस्तिका, कार्डचे लोकार्पण.

 

काछीपुरा: महिलांना मार्गदर्शनपर पुस्तिकेचे प्रकाशन करताना पोलिस उपायुक्त विनिता साहू, शेजारी अजित पारसे, विष्णू मनोहर, विजय जथे.

नागपूर: सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या महिलांच विविध बाबींना बळी पडत आहे. त्यांना सोशल मिडिया वापरताना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मार्गदर्शक पुस्तिका तसेच कुठेही मोबाईलच्या एका कॉलवर ई-टायलेट आदी उपलब्ध करून देण्यासाठी ‘सुचिका` कार्डचे लोकार्पण नुकताच पोलिस उपायुक्त विनिता साहू यांच्या हस्ते पार पडले.

शेफ विष्णू मनोहर तसेच सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी सोशल मिडिया वापरणाऱ्या महिलांसाठी ‘सुचिका‘ ही मोहिम सुरू केली. महिलादिनानिमित्त सोमवारी या मोहिमेच्या अनुषंगाने काछीपुरा येथील विष्णुजी की रसोईमध्ये पोलिस उपायुक्त विनिता साहू यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. विनिता साहू यांनी यावेळी सोशल मिडिया किंवा सायबर गुन्हेगारी एक मोठे आव्हान असून यात महिला बळी पडत असल्याचे नमुद केले. नागपूर पोलिसांनी आतापर्यंत चाईल्ड पोर्नोग्राफीचे १२ प्रकरणे दाखल केले.

यात महिला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. काही सर्व्हर यूएसमध्ये असल्याने प्रकरणे निकाली काढण्यात वेळ लागतो. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी ही मोहिम उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते एका महिलेला ‘सुचिका` हे कार्ड देण्यात आले. ही मोहिम मनोरंजनासाठी नव्हे तर सुरक्षित महिला, सुरक्षित कुटुंबांसाठी असल्याचे सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले. उद्यमी महिलांना विविध ॲप्सचा वापर, ऑनलाईन बॅंकिंग व्यवहार, बिल भरतेवेळी येणाऱ्या अडचणी याबाबत मार्गदर्शनासाठी शिबिरे घेतली जातील, असेही ते म्हणाले.

दुपारी घरी एकट्याच असलेल्या महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मिडियावरील समाजकंटक प्रयत्न करतात. याबाबत महिलांमध्ये स्टिकर, माहितीपुस्तिका, शिबिरे, चर्चासत्राच्या माध्यमातून जनजागृती तसेच प्रशिक्षण दिले जाईल, असेही पारसे म्हणाले.

‘सुचिका` या मोहिमेद्वारे महिलांमध्ये सोशल मिडियाच्या वापरासंबंधी जनजागृतीशिवाय महिलांना एका फोनवर बाजार किंवा जिथे असेल तिथे ई-टॉयलेट तसेच फिडिंग रूम उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले. सुचिका कार्डवर एक क्रमांक दिला जाईल, त्यावर फोन केल्यास ही सुविधा उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमुद केले.