Published On : Fri, Dec 13th, 2019

अदृष्य निषेधाने महिला सुरक्षितेसाठी सकारात्मक बदल:अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक।

Advertisement

हैदराबाद घटनेनंतर सोशल मिडियावर जनक्षोभ, पोलिसांच्या विचारसरणीलाही वेगळे वळण.

नागपूर: हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी अत्याचार व खूनप्रकरणानंतर जनक्षोभ रस्त्याऐवजी सोशल मिडियावर उफाळून आले. सोशल मिडियावरील संतापाचे रुपांतर प्रत्यक्ष रस्त्यावर झाल्यास गंभीर परिणामाचा दबाव वाढल्याने पोलिसांनी तत्काळ एन्काऊंटर करीत प्रकरण निकाली काढले असे दिसून येत आहे. यानंतर संतापाचे रुपांतर पोलिसांच्या समर्थनात झाले असून सोशल मिडियावरील या अदृश्‍य निषेधाने महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक सकारात्मक बदल झाल्याचे निरीक्षण सोशल मिडिया विश्‍लेषक, अभ्यासक नोंदवित आहेत.

येत्या काही दिवसांमध्येच निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येईल, असे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर निर्भया प्रकरणात न्यायासाठी झालेल्या आंदोलनाचा आढावा घेतल्यास संपूर्ण देशातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. या काळात आरोपींवर कारवाईसाठी उपोषणे, बंद, शाळा, महाविद्यालयांना सुटी आदी आंदोलनाचे प्रकार झाले. उन्नाव घटनेनंतरही देशाच्या काही भागात आंदोलने झाली. ही आंदोलने म्हणजेच दृश्‍य निषेधाचे स्वरुप होते तर डॉ. प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणात जगभरातून सोशल मिडियावर निषेधाचा सूर उमटला.

विविध वाहिन्यांवरील चर्चेतून पोलिसांवर हा रोष होता. सोशल मिडियावरील हा निषेध अदृश्‍य असला तरी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिणामकारक ठरल्याचे हैदराबाद पोलिसांच्या कारवाईतून दिसून आल्याचे सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नमुद केले.

या अदृष्य निषेधाचाच एवढा दबाव निर्माण झाला की शाळा, कॉलेज बंद, शहर बंद, उपोषण, दंगली झाल्या नाहीच, शिवाय नेहमी विरोधात असलेल्या नागरिकांनी यावेळी प्रथमच पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. आतापर्यंत सैनिकांवर फुलांचा वर्षाव भारतीय जनतेने बघितला. परंतु प्रथमच पोलिसांवर सोशल मिडियातून कौतुकासोबत फुलांचा वर्षाव झाल्याने देशभरातील पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत तत्काळ पाऊले उचलली आहेत. नागपूर पोलिसांनी रात्रीच्या वेळी महिला, तरुणींना घरी सोडून देण्याची सेवा सुरू केली. ही सेवा देशातील आणखी काही पोलिस विभागानेही सुरू केली.

सोशल मिडियावरील जनसामान्यांच्या आक्रमकतेतून ज्या प्रकारे अदृश्‍य निषेध व्यक्त झाला, त्यातून पोलिसांनी कार्यवाहीस तत्परता दाखविली. नागरिक व पोलिसांच्या सोशल मिडियावरील दुतर्फी संवादने सकारात्मक परिणाम साध्य झाल्याचे पारसे यांनी नमुद केले. सोशल मिडियाचा केवळ नकारात्मक वापर होतो, अशी ओरड करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा प्रकार आहे. सोशल मिडियावरील अदृष्य निषेधाने म्हणजेच डिजिटल प्रोटेस्टमुळे यंत्रणेस न्याय देण्यास भाग पाडल्याचे चित्र आहे. त्यामुळे डिजिटल युगातील बदलांना सर्वांनी आत्मसात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खऱ्या अर्थाने सोशल मीडिया हा लोकशाहीचा पाचवा आधारस्तंभ आहे.

सोशल मिडिया आज संवादाचे प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे महिला, तरुणींच्या सुरक्षिततेसाठी आता सर्वस्तरीय पोलिसांनी फेसबूक ग्रुप तयार करावा. हा ग्रुप पोलिस महिला कर्मचाऱ्यांनी हाताळताना त्यात त्या परिसरातील जास्तीत जास्त, विशेषताः कामकाजी महिलांचा समावेश करणे गरजेचे आहे. या ग्रुपवर 24 तास नजर ठेऊन महिलांना आपातकालीन मदत देता येईल, शिवाय कुठल्याही अप्रिय घटनेला आळाही घालता येईल.

-अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक.