Published On : Fri, Feb 7th, 2020

मूल्य आधारित शिक्षणाची गरज पद्‌मभूषण डॉ. पिल्लई : अ. भा. प्राचार्य परिषद

रेशीमबाग प्राध्यापक परिषेदत बोलताना पद्‌मभूषण डॉ. सिवाथानू पिल्लई, सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे व मान्यवर.

नागपूर: प्राचीन काळापासून देशाला बुद्धीवाद्यांची परंपरा आहे. आज देशात अनेक शिक्षण संस्था, तंत्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तरीही अद्याप संपूर्ण देश साक्षर नाही, अशी खंत व्यक्त करीत देशात मूल्य आधारित शिक्षणाची गरज पद्‌मभूषण व ‘इस्रो’तील प्राध्यापक डॉ. सिवाथानू पिल्लई यांनी व्यक्त केली.

रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपलची एकविसावी राष्ट्रीय परिषद सुरू आहे. आज सकाळी पहिल्या सत्रात ‘भारतात उच्च शिक्षणाची पुनर्निमिती’ या विषयावर ते बोलत होते. येथे मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी लेखक डॉ. भूषण केळकर, सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी अनुक्रमे शिक्षण प्रणाली, सोशल मिडियाची शिक्षणाचा दर्जा वाढविण्यात महत्त्वाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. यावेळी ब्रम्होस मिसाईलचे जनक डॉ. पिल्लई यांनी देशभरातून आलेल्या पाचशेवर प्राचार्यांना मार्गदर्शन केले. देशात आज सूचना तंत्रज्ञानाने प्रगती केली. गेल्या पाच दशकात शिक्षण क्षेत्रानेही अनेक मैलाचे दगड पार केल्याचे नमुद करीत डॉ. पिल्लई म्हणाले, भारताला हुशार लोकांची परंपरा आहे.

भारतीयांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्र पादाक्रांत केली. आज देश ‘मेडिकल टुरिज्म’ आहे. संगणक क्षेत्रातही भारताने क्रांती केली. यातून मोठ्या प्रमाणात उतन्न मिळाले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या केली होती. सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक बदल करणारी प्रणाली म्हणजे शिक्षण अशी त्यांची व्याख्या होती. परंतु आज मागे वळून पाहिले तर तसे झाले काय? याबाबत सांगता येणार नाही. आम्ही शिक्षण घेतले, त्या काळात शिक्षकांच्या हातात छडी असली तरी त्यांचा आदर होता. आज मात्र चित्र फारसे समाधानकारक नाही. भ्रष्टाचार, दहशतवाद वाढला आहे. यापासून तरुणाईला परावृत्त करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मूल्य आधारित शिक्षणाची गरज आहे.


माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांनीही शिक्षणाची व्याख्या केली. शिक्षणातून सर्जनशीलता, सर्जनशीलतेतून विचार आणि विचारातून माहिती निर्माण होते. प्राध्यापक, प्राचार्यांवर माहिती देण्याची आणि पर्यायाने शिक्षणाची जबाबदारी आहे.

आज शिक्षण प्रणालीत सुधारणेची गरज असून अशा परिषदेतून ते साध्य होत आहे, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेजला युजीसीने मान्यता द्यावी. या असोसिएशनकडून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलाची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आयोजन समितीतील धरमपेठ सायन्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अखिलेश पेशवे, एमके उमाठे कॉलेजचे प्राचार्य डी. व्ही. नाईक, बॅरिस्टर शेषराव वानखेडे कॉलेजचे प्राचार्य डॉ. रामकृष्ण टालेही उपस्थित होते.

सोशल मिडियाद्वारे शिक्षण सुधारण्याची संधी, अजित पारसे.
शिक्षणाच्या उच्च दर्जासाठी महाविद्यालये, शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांत सोशल मिडियाद्वारे सकारात्मक समन्वय साधता येतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी धोरण तयार करण्याची गरज सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. सोशल मिडिया केवळ मनोजरंजनाचे साधन नसून शैक्षणिक, औद्योगिक प्रगतीचे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी सांगितले.