
नागपूर : अजनी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी राबवलेल्या विशेष कारवाईत बेकायदेशीर शस्त्र आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या ठोस माहितीनंतर ही कारवाई ४ जानेवारी २०२६ रोजी सायं. ५.१० ते ५.५० या वेळेत करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अजनी पोलीस तपास पथकाने पार्वती नगर येथील फुलमती माता मंदिराजवळील प्लॉट क्रमांक १७ येथे छापा टाकला. आरोपी सागर बृजमोहन पाल (वय ३३) याच्या राहत्या घराची पंचनामा करून झडती घेतली असता, शयनगृहातील लाकडी पलंगावरील गादीखाली एक माऊझर पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याची अंदाजे किंमत सुमारे ८२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान सागर पाल याने हे पिस्तूल व काडतुसे त्याचा मित्र प्रमोद राजेंद्र सूर्यवंशी (वय ३१, रा. दत्तधाम नगर, मानेवाडा रोड) याचे असल्याचे सांगितले. सुरक्षिततेसाठी सूर्यवंशीने हे शस्त्र आपल्याकडे ठेवण्यास दिल्याचा दावा आरोपीने केला आहे.
दोन्ही आरोपींकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना शस्त्र व काडतुसे आढळून आल्याने तसेच बंदी आदेशांचे उल्लंघन झाल्याने अजनी पोलिसांनी शस्त्र कायद्याच्या कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (झोन-४) रश्मिता राव व सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभागाने पार पडली.









