Published On : Fri, Jun 1st, 2018

७ व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी ‘AIGDSU’ चे धरणे आंदोलन’!

Advertisement

AIGDSU's demands for 7th Pay Commission
नागपूर: ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना ७ वा वित्त आयोग लागू करण्यात यावा यासाठी ग्रामीण डाक सेवक कर्मचारी संघटनांच्या वतीने २२ मे पासून देशव्यापी संप छेडण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने आज दिनांक १ जून रोजी नागपूर, गोंदिया व भंडारा विभागाच्या ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांनी शंकरनगर चौक येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते.

कमलेश चंद्रा समितीच्या ७ व्या वेतन आयोगा-संबंधीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात ही ग्रामीण डाक सेवेतील कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सदर संपामध्ये एकूण देशभरातील २,७०,००० ग्रामीण डाक सेवक आणि कर्मचारी सहभागी १,२९००० ग्रामीण टपाल कार्यालयांची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

आपल्या मागण्यांसाठी १५ मार्च २०१८ ला दिल्ली येथे पंतप्रधानाच्या निवास्थानासमोर ७ कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले, परंतु सरकारने दाद दिली नाही. अखेर अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटना (AIGDSU) आणि नॅशनल युनिअन ऑफ ग्रामीण डाक सेवक संघटना (NUGDS) यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला.

गंभीर बाब म्हणजे या संपादरम्यान लक्ष्मण पुंडलिक खवासे रा. पलूस, सांगली, नत्थू गोविंदा शिरपूरकर रा. मोहपा, नागपूर, आणि नागेंद्रप्रसाद राऊळगाव, कर्नाटक यांचा मृत्यू झाला आहे.

डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संपकरी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी संपकऱ्यांना ४५ दिवसांचा कालावधी मागून घेतला. परंतु अजूनही काही ठोस कार्यवाही झाली नसून फक्त टाळंटाळ सुरु असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून संपकऱ्यांच्या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे परंतु मंत्रिमंडळाकडून अद्याप मंजुरी मिळावयाची आहे.