Published On : Fri, Nov 22nd, 2019

अकराव्या ॲग्रोव्हिजन चे उद्घाटन संपन्न

Advertisement

नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व कृषी संशोधनाला चालना मिळण्याच्या हेतूने शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण व कृषी विस्तार उपक्रमासाठी एक कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रेशीमबाग मैदानात आयोजित अकराव्याॲग्रोव्हिजन – कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे ,माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , क्रॉपकेअर फाउंडेशन व यूपीएल समूहाचे अध्यक्ष राजूभाई श्रॉफ उपस्थित होते.

कृषीपूरक व्यवसायांचे महत्व अधोरेखित करतांना गडकरी यांनी यावेळी सांगितले की, मैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेतर्फे शुगर क्यूबप्रमाणे ‘हनी’ क्यूबची निर्मिती होत असल्याने विदर्भातील आदिवासी भागात मध उत्पादन उद्योगाला चालना मिळेल.

नागपूरच्या मदर डेअरीतर्फे निर्मित संत्रा बर्फी मुळे दूध व संत्रा यांच्या उत्पादनाला चांगली मागणी मिळत आहे. देशी गाईंचे संकरित वाण निर्माण करून त्यांची दूध उत्पादकता वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे एक प्रयोगशाळा सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

जट्रोफा, करंज, बांबू यासारख्या जैवइंधन क्षमता असलेल्या पिकांचे उत्पादन वनबहुल असलेल्या भागात घेतल्यास विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधन निर्मितीला त्याचा उपयोग होईल असे त्यांनी नमूद केले. सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग यांच्या कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये असणाऱ्या महत्वाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की विदर्भातील कापूस, संत्रा यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारी सर्व मदत एमएसएमई विभागातर्फे करण्यात येईल. विदर्भातील शेतकऱ्यांनी या विभागातर्फे राबविला जाण्यात जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उद्घाटन सत्रानंतर ॲग्रोव्हिजन प्रदर्शनीत लावण्यात आलेल्या स्टॉल्सला सुद्धा गडकरी यांनी भेट दिली. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या लोक संपर्क ब्युरोच्या ‘केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण भागातील धोरणाविषयीच्या’ माहिती प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले.22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या चार दिवसीय कार्यशाळेच्या दरम्यान विविध कार्यशाळा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे 23 नोव्हेंबर रोजी ‘विदर्भातील दुग्धोत्पादन विकास व प्रक्रिया उद्योगांमधील संधी’, 25 नोव्हेंबर रोजी ‘विदर्भामधील कृषी उद्योगांमध्ये लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगांना संधी’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा होणार आहेत.

ॲग्रोव्हिजन च्या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी व संशोधन संस्थांचे पदाधिकारी, केंद्र व राज्य शासनाचे विभागातील अधिकारी व देशातील विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते