Published On : Mon, Nov 25th, 2019

‘ग्रीन क्रूड’च्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ‘ऍग्रोव्हिजन’मध्ये नोंदणीसाठी प्रतिसाद : फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतली माहिती.

Advertisement

शेतकऱ्यांना माहिती देताना ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे, सचिव अजित पारसे

नागपूर: शेती उत्पन्नापासून तयार करण्यात येणाऱ्या ग्रीन क्रूड ऑईलने विदर्भासह संपूर्ण देश समृद्ध करून देशाचा इंधन आयातीवरील 7 लाख कोटींचा खर्च वाचविण्याचा निर्धार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. त्यांच्या निर्धाराला मूर्त स्वरुप देण्यासाठी ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन प्रयत्न करीत असून त्यांच्या स्टॉलवर दररोज हजारो शेतकरी भेट देऊन नोंदणी करीत आहे.

रेशीमबाग मैदानावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून देशातील सर्वात मोठे कृषीप्रदर्शन ‘ऍग्रोव्हिजन’ सुरू आहे. या कृषी प्रदर्शनात ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचा स्टॉल शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या स्टॉलवर शेतकऱ्यांना ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे सचिव अजित पारसे शेतकऱ्यांशी चर्चा करून फाऊंडेशनची भूमिका स्पष्ट करीत आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष व संशोधक डॉ. हेमंत जांभेकर यांच्या नेतृत्त्वात शेतमालापासून जैवइंधनाचा प्रयोग सुरू आहे. कृषी मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी नैराश्‍याने ते फेकून देतो.

या कृषी मालाचा उपयोग इथेनॉल, जैवइंधन निर्मितीसाठी केल्यास देशातील शेतकरी समृद्ध होईल. त्यादिशेने ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे कार्य महत्त्वाचे असल्याचे पारसे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. देशाची आगेकूच 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. यात जैवइंधननिर्मितीची भूमिका मोठी राहणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्याच भागात जैवइंधननिर्मिती प्रकल्प स्थापन करून रोजगार मिळवून देणे, उद्योग सहायता प्रकल्प राबविणे, शेतकऱ्यांना जैवइंधनाबाबत सोशल मिडिया, इंटरनेट, संगणकाद्वारे सादरीकरणातून संपूर्ण माहिती देण्याचे काम ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन करीत आहे.

अगदी तळागळातील शेतकऱ्यांना थेट उद्योगजगतापर्यंत जोडले जाण्याचे काम फाऊंडेशनतर्फे करण्यात येत असल्याचे पारसे यांनी नमुद केले. यासाठी शेतकऱ्यांना निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येत असून सोशल मिडियाद्वारे कृषी उद्योगापर्यंत त्यांना पोहोचविण्यासाठी व्यासपीठ म्हणून फाऊंडेशन कार्य करीत आहे. गेल्या चार दिवसांत या स्टॉलला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली. शेतकऱ्यांनी फाऊंडेशनकडे नोंदणी केली असून जैवइंधनाबाबत कार्यशाळा, चर्चा, प्रशिक्षण आदी कार्यक्रम राबविले जाणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्याच भागात जैवइंधननिर्मिती प्रकल्प स्थापन करून रोजगार मिळवून देणे, इंधन आयातीवरील देशाचे सात लाख कोटी वाचविण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी सोशल मिडियाच्या वापरातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ, तसेच शेतकरी व उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचेही काम सुरू आहे.

– अजित पारसे, सचिव, ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन.