मुंबई: मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतून राज्याला 2500 मेगावॉट सौर ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य असून या योजनेसाठी निर्माण करण्यात आलेल्या विभागांनी प्रत्येकी 500 मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण करायची असून त्यासाठी जागा शोधण्याचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत व जागा ताब्यात घेण्याचे काम मार्च अखेरपर्यंत संपवावे, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी प्रधान सचिव ऊर्जा अरविंद सिंह उपस्थित होते.
महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बैठकी घ्याव्या व जागांचा शोध घ्यावा. शासकीय जागा, गावठाणच्या जागा, सिंचन तलावाजवळील जागा, शेतकऱ्यांच्या पडित जमिनी, खडकाळ जमिनींचा शोध घ्यावा व या प्रकल्पासाठी जागा मिळवावी. जमिनीचा डाटा महाऊर्जाकडे आहे. तो घ्यावा व जागा मिळवण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय महानिर्मितीच्या अनेक प्रकल्पांजवळ जागा आहेत. त्या जागांही या योजनेसाठी घेता येतील. तसेच एमआयडीसीमध्ये तालुका स्तरावर जागा रिकाम्या आहेत. त्या जागाही या प्रकल्पासाठी घेणे शक्य आहे. कोणत्याही स्थितीत 500 मेगावॉटचा प्रकल्प डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करून सुरू होणे आवश्यक आहे.
या प्रकल्पाची माहिती आणि जागेसाठी तालुका स्तरावर मोठे मेळावे आयोजित करा. जागेच्या मागणीची घोषणा करा. यासाठी महाऊर्जाच्या विभागीय कार्यालयांची मदत घ्या. महाऊर्जा व महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांची दर आठवडयात बैठक घ्या, अश्या सूचनाही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत दिल्या.