नागपूर : सरकारला ‘भिकारी’ म्हणण्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. या विधानावरून त्यांच्यावर सर्वपक्षीय टीकेचा भडिमार होत आहे. केवळ विरोधकच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाचे नेतेही त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.
शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कोकाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ माफी मागण्याची मागणी केली आहे. “अशा प्रकारचे वक्तव्य सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. मंत्रीपदावर बसून असे बोलणे निषेधार्ह आहे,” असे भोंडेकर म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून कोकाटे यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. “जनतेचे प्रतिनिधी अशी भाषा वापरत असतील तर सरकारची विश्वासार्हता टिकणार नाही,” असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
या वादानंतर माणिकराव कोकाटे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी त्यांच्यावरचा दबाव वाढत चालला आहे. राजकीय वर्तुळात आता यापुढे कोकाटे यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.