
गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने नागपूरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या लावा गावात कार्यरत ‘एनजेपी एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेवर छापा टाकला. येथे परेश विजय खंडाईत (वय ३२) हे प्रशांत विठोबाजी बोरकर यांच्या मालकीच्या गोडावनात विनापरवाना जैविक खत, रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे उत्पादन करत होते.
कारखान्यात निम पॉवर, भूशक्ती, ब्लॅक गोल्ड, वरदान गोल्ड, एग्रो मॅक्स गोल्ड, सिल्व्हर शाईन अशा नावे छापलेल्या पिशव्यांमध्ये उत्पादन भरले जात होते. मात्र यासाठी कोणतीही शासकीय मान्यता प्राप्त नव्हती.
छाप्यादरम्यान पथकाने वेस्टन, रिकाम्या बाटल्या, पिशव्या, पॅकिंग मशीन, विविध प्रकारची खते आणि द्रव्य पदार्थ जप्त केले. एकूण जप्त साहित्यासह मुद्देमालाची किंमत ५२ लाख ६१ हजार रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
ही कारवाई संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण अशोक किरनळी, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये तालुका निरीक्षक रिना डोंगरे, जिल्हा निरीक्षक मार्कंड खंडाईत, कृषि अधिकारी प्रभाकर मोतीकर, तसेच वाडी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राहुल सावंत व पथकातील पोलीस कर्मचारी सहभागी होते.
दरम्यान, रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कलम ७, १९, २८, ३५ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३(२)(ए), ३(२), ३(२)(डी) च्या उल्लंघनप्रकरणी परेश खंडाईत यांच्याविरोधात वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलीस तपास सुरु आहे.