नागपूर : नागपूर ग्रामीण भागात एक भयानक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका व्यक्तीचा दिवसाढवळ्या मृतदेह जळताना बघून स्थानिकांमध्ये खळबळ उडाली.खापरखेडा जवळील एका बर्फ कारखान्याजवळ ही घटना घडली. ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. शहराला हादरवून टाकणारा हा व्हिडीओ ‘नागपूर टुडे’च्या हाती लागला आहे.
हत्या की आत्महत्या? पोलिस तपासात गुंतले-
या घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. ‘नागपूर टुडे’शी बोलताना ग्रामीण एसपी हर्ष पोद्दार म्हणाले की, या घटनेसंदर्भात अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
घटनास्थळी काय सापडले?
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक दुचाकी वाहन पेट्रोल टाकी उघडी आढळून आली. याशिवाय जवळच एक बॅगही पडली होती. सध्या मृताची ओळख पटलेली नाही आणि पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
घटनेचा व्हॅलेंटाईन डेशी संबंध असू शकतो?
ही घटना व्हॅलेंटाईन डे च्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी घडली, ज्यामुळे या प्रकरणाबद्दल अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. काही लोकांना वाटते की प्रेम प्रकरणाशी संबंधित ही घटना असून शकते. त्याअनुषांगानेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी काही पथके तयार केली आहेत या प्रकरणाचा बारकाईने तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच घटनेमागील सत्य समोर येईल. सध्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.