नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर संघटनेत मोठा बदल करत माजी महापौर दयाशंकर तिवारी यांची नागपूर शहर भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून, ठिकठिकाणी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा –
दयाशंकर तिवारी यांची पक्षाध्यक्षपदी निवड होताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार उत्सव साजरा केला. भाजप कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी झाली, तर अनेक ठिकाणी मिठाई वाटून व पुष्पहार घालून त्यांचं अभिनंदन करण्यात आले. सोशल मीडियावरही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पक्षश्रेष्ठींना धन्यवाद-
आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना तिवारी म्हणाले, माझ्यावर पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मान्यवर नेत्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची आहे.
तिवारींचा अनुभव आणि संघटन कौशल्य पक्षासाठी फायद्याचं-
दयाशंकर तिवारी हे नागपूरचे माजी महापौर असून त्यांना संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वीही पक्षाच्या विविध पदांवर काम करताना कार्यकर्त्यांमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वात आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा विश्वास पक्षात व्यक्त केला जात आहे.तिवारी यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीमुळे नागपूर शहरातील भाजप संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती अधिक ठोस आणि कार्यक्षम होईल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.