बीड : मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी करण्यात येत असली तरी त्यांनी सरकारवर पुन्हा टीका करत इशारा दिला. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगे-सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू, असे आम्हाला सांगितले होते, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खोटे बोलून डाव साधला, असा आरोप जरांगेंनी केला आहे.त्यामुळे आचारसंहिता संपल्यावर गाठ आमच्याशी आहे,’ असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांना इशारा दिला आहे.
फडणवीसांना माझ्यासोबत बोलायचे नव्हते, पण पहाटे तीन वाजता त्यांनी मला फोन केला होता, असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केला. आचारसंहिता असेपर्यंत मी कायद्याचं पालन करणार आहे, पण मी शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.
सरकारने मराठा समाजाला वेठीस धरले. मात्र न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. ज्या जनतेच्या जिवावर सरकार मोठे झाले तेच नेते आमच्यावर अन्याय करीत आहेत.
गुन्हे दाखल करीत आहेत. फडणवीस यांनीच हे सगळं सुरू केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली.
परंतु मी फुटणार नाही आणि हटणार नाही.मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.’गृहमंत्री आमच्या विरोधात आक्रमकतेने वागत आहे. न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र गृहमंत्र्यांचा द्वेष खूप भयंकर असल्याचेही ते म्हणाले.