Published On : Fri, Jun 18th, 2021

१३० दिवसानंतर मृत्यूचा आकडा शून्य

Advertisement

नागपूर : नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने कोरोनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु धीर, संयम आणि संघटितपणे सामना करणाऱ्या नागपूरकरांनी कोरोना नियंत्रणात आणला असे म्हणायला हरकत नाही. कारण, १७ जून रोजीच्या आकडेवारीनुसार नागपूर शहरातील एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. विशेष म्हणजे तब्बल १३० दिवसानंतर नागपूरकरांना हा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी शहरात मृत्यूचा आकडा शून्य नोंदविला गेला होता. त्या दिवशी शहरात २२३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. ३१५ रुग्ण बरे झाले होते आणि एकूण २४३८ रुग्ण सक्रीय होते. तब्बल १३० दिवसानंतर म्हणजे गुरुवार १७ जून रोजी शहरात ६७६० चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३४ रुग्ण पॉझिटिव्ह नोंदविण्यात आले. ९४ रुग्ण बरे झाले. यामुळे सद्यस्थितीत शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९५५ इतकी आहे.

Advertisement
Advertisement

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध, त्यानंतर नागपुरातील नागरिकांनी दाखविलेला संयम, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेले अथक परिश्रम, जिल्हा प्रशासन, महापालिका पदाधिकारी, प्रशासन यांनी ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी, बेडसंख्या वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत, केलेली धावपळ, महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात मनपा चमूने केलेले कार्य अशा एकत्रित प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितले की, नागरिक, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाच्या प्रयत्नाने मृत्युचा आकडा शून्यावर आला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार आता निर्बंध शिथील करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भात असलेल्या नियमांचे पालन सार्वजनिक ठिकाणी वावरताना करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन अवश्य करावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement