Published On : Fri, Feb 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘अॅडव्हांटेज विदर्भ 2026′ खासदार औद्योगिक महोत्सव’ 6 फेब्रुवारीपासून; गडकरी–फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन!

Advertisement

नागपूर : असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सवा’च्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. हा भव्य औद्योगिक मेळावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात, अंबाझरी–अमरावती मार्गावर आयोजित करण्यात आला आहे.

उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री व खासदार औद्योगिक महोत्सवाचे संकल्पक नितीन गडकरी भूषवतील, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Gold Rate
06 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,52,500 /-
Gold 22 KT ₹ 1,41,800 /-
Silver/Kg ₹ 2,42 300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यक्रमाला केंद्र व राज्य शासनातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रोजगार मंत्री आकाश फुंडकर, वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर तसेच उद्योग व पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे.

देशातील आघाडीचे उद्योगपतीही या महोत्सवात सहभागी होणार आहेत. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, अदानी एअरपोर्ट्सचे संचालक जीत अदानी, तसेच महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर हे प्रमुख उद्योगविश्वातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीन टोबूल, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन (आयएएस) आणि मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक व उद्योग विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे हेही उपस्थित राहतील.

महोत्सवाच्या निमित्ताने दिवसभर शिक्षण, संरक्षण क्षेत्र, अन्न प्रक्रिया, मत्स्य व्यवसाय तसेच डेअरी उद्योग या विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी 6 वाजता नागपूरच्या सुप्रसिद्ध गायिका श्रीनिधी घटाटे यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

विद्यार्थी, उद्योजक, उद्योग प्रतिनिधी व नागपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या औद्योगिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पार्किंग व्यवस्था :
व्हीआयपी, स्टॉलधारक आणि अभ्यागतांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली असून, स्टॉलधारक व व्हिजिटर्स यांनी नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी–अमरावती मार्गावरील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करावा, असे आयोजकांनी कळवले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement