Published On : Wed, Jul 28th, 2021

मनपाच्या इंग्रजी शाळांमध्ये ३१ जुलै पर्यंत प्रवेश : महापौर

Advertisement

रामभाऊ म्हाळगीनगर इंग्रजी शाळेमध्ये प्रवेशाचा शुभारंभ

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शहरात सहा विधानसभा क्षेत्रामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात येत आहे. या शाळांमध्ये केजी १ व केजी २ वर्गामध्ये ३१ जुलै पर्यंत प्रवेश घेतल्यास ते प्रवेश सुनिश्चित मानल्या जाईल. त्यानंतर प्रवेशासाठी अर्ज देण्या-या विद्यार्थ्यांसाठी सोडत टाकून (लॉटरी सिस्टम मधून) नावे निश्चित केले जातील, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी आपल्या भाषणात दिली. महापौरांच्या हस्ते दक्षिण नागपूरातील रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ बुधवारी (२८ जुलै) रोजी करण्यात आला.

नागपूर मनपा तर्फे आकांक्षा फाऊंडेशनच्या सहकार्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्यात येत आहे. बुधवारी आकांक्षा फाऊंडेशनच्या पदाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले की जे विद्यार्थी ३१ जूलै पर्यंत प्रवेश घेतील त्यांचा प्रवेश सुनिश्चित समजला जाईल. नंतर प्रवेश साठी येणा-या विद्यार्थ्यांचे नांव लॉटरी सिस्टीम मधून निश्चित करण्यात येतील. महापौरांनी सांगितले की, मनपा इंग्रजी शाळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुढे बोलतांना महापौर म्हणाले की, नागपूर शहरातील झोपडपट्टी भागात राहणा-या मुलांना मनपाद्वारे नि:शुल्क दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संकल्पना पुढे आली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविताना येणारे अनेक अडथळे पार करण्यात आले. प्रतिभा असून केवळ परिस्थितीमुळे उत्तम शिक्षण घेउ न शकणा-या विद्यार्थ्यांसाठी मनपाद्वारे नि:शुल्क इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचा मार्ग आज मोकळा झालेला आहे. या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या शहरातील गरीब आणि गरजू परिवारातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरणार आहेत, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमामध्ये शिक्षण सभापती दिलीप दिवे, हनुमाननगर झोन सभापती श्रीमती कल्पना कुंभलकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष विजय (पिंटू) झलके, स्थापत्य समिती सभापती श्री. राजेन्द्र सोनकुसरे, शिक्षण उपसभापती सुमेधा देशपांडे, नगरसेविका श्रीमती विद्या मडावी, स्वाती आखतकर, लिला हाथीबेड व आकांक्षा फाऊंडेशनचे प्रतिनिधी श्री राहुल व सोमसूर्व आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकामध्ये शिक्षण सभापती दिलीप दिवे यांनी सांगितले की, कोरोना या महामारीमुळे ओढवलेल्या संकटात सर्वसामान्य, गरीब पालकांच्या मुलांना नि:शुल्क दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. या शाळेमध्ये के.जी. वन, के.जी.टू आणि पहिल्या वर्गासाठी प्रवेश देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या निर्देशानंतरच शाळा सुरू होणार असल्या तरी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती प्राथमिक शाळा, पूर्व नागपुरातील बाभुळबन मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण-पश्चिम नागपुरातील स्व.बाबुराव बोबडे मराठी प्राथमिक शाळा, पश्चिम नागपुरातील रामनगर मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण नागपुरातील रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळा आणि मध्य नागपुरातील स्व.गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळा या मनपाच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू होणार आहेत.

कार्यक्रमाचे संचालन श्रीमती प्रीति भोयर तर आभार प्रदर्शन श्रीमती मिश्रीकोटकर शिक्षणाधीकारी यांनी केले.