Published On : Sat, Apr 21st, 2018

प्रशासकीय यंत्रणेने आता मिशनमोडमध्ये काम करावे – अनूप कुमार

Anoop Kumar

नागपूर: प्रशासकीय रचनेत आणि प्रशासनाच्या भूमिकेत होणारे बदल समजावून घेणे आणि त्या भूमिकेची सुसंगत अशी सेवा देणे हे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे. प्रशासकीय यंत्रणा नियंत्रकाच्या नव्हे तर प्रोत्साहकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे यंत्रणांनी स्पर्धात्मक वातावरणात मिशनमोडमध्ये काम करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.

बाराव्या भारतीय नागरी सेवा दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात प्रशासनातील बदल, नवे प्रयोग तसेच माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, यादृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये देवाण-घेवाण व्हावी. या हेतूने आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना अनूप कुमार बोलत होते.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आयकर विभागाचे आयुक्त संदीप बंधू, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम आशुतोष श्रीवास्तव, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, नागपूर मेट्रोचे वरिष्ठ व्यवस्थापक अनिल कोकाटे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, विभागीय महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, परिविक्षाधिन प्रशासकीय अधिकारी श्रीमती इंदू जाखर, कृष्णा पांचाळ, श्रीराम मूर्ती आदी यावेळी उपस्थित होते.

भारतीय नागरी सेवा दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सकारात्मक बदलासंदर्भात विचारमंथन होवून प्रशासनामध्ये अधिक पारदर्शकता, गतिमानता तसेच प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जनतेला चांगल्या सेवा देण्याचा उद्देश असल्याचे सांगताना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, देशातील प्रशासकीय सेवेत बदल होत आहेत. माहितीचा अधिकार, सेवा हमी कायदा आदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी आपली मनोभूमिका बदलली पाहिजे.

प्रशासकीय व्यवहारात मोठे बदल होत आहेत, लोकांच्या अपेक्षा आणि या बदलांचे स्वरुप समजून घेतले पाहिजे. प्रशासकीय सेवेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ही सेवा पारदर्शक, जबाबदार, कालबद्ध व कार्यक्षम होणे अपेक्षित असल्याचे सांगताना अनूप कुमार म्हणाले की, या रचनेला सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलादी चौकट असे संबोधले होते. भारतातील प्रशासकीय रचनेचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.

K Venkatesham
पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम
नागरी सेवा ही जनतेच्या सेवेची संधी आहे. त्यामुळे नागरी सेवेमध्ये सकारात्मक बदलाचा स्वीकार करुन नवीन तसेच परिवर्तनामध्ये आपला सहभाग वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करताना पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् म्हणाले की, प्रभावी प्रशासनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत-जास्त वापर करुन जनतेला चांगल्या व परिणामकारक सेवा कशा देता येईल. याकडे सातत्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

प्रभावी पोलीस प्रशासनाबद्दलच्या अपेक्षा तसेच जनतेला देण्यात येणाऱ्या सेवेसंदर्भात सांगताना डॉ. व्यंकटेशम् म्हणाले की, शहराचा विस्तार वाढत असतानाच उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करुन जनतेला चांगल्या सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. यासाठी पोलीस विभागाची क्षमता वाढविणे, मनोबल वाढविणे तसेच कामांचे विश्लेषण व संशोधन करुन पोलीस प्रशासनाबद्दलच्या अपेक्षा आणि आकलनाचे सर्व्हेक्षण करुन जनतेला अपेक्षित असलेल्या सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पोलिसांची नागरिकांमधील सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, स्वत:च्या संकल्पना वापरुन सर्वोत्तम कार्य होवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे महिलांच्या संरक्षणासाठी सुरु करण्यात आलेला भरोसा सेल, दामिनी पथक, एन-कॉप्स आदी उपक्रमाचा समावेश आहे. उत्कृष्ट सेवा देणारे नागपूर हे राज्यातील पहिले शहर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशासनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन जनतेच्या अपेक्षेनुसार सेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांच्या प्रश्नासंदर्भात हॅलो चांदा हे व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोश सलील यांनी या उपक्रमाचे सादरीकरण करताना सांगितले की, जनतेच्या तक्रारी काल मर्यादेत सोडविण्यासाठी डॅशबोर्डचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून 5 हजार 200 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. त्यासोबतच ई-ऑफिसची संकल्पना राबवून जनतेची कामे कालमर्यादेतच पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे कामात पारदर्शकता निर्माण झाली.

महाऑनलाईन आणि डिजिटलायझेशन करुन तसे प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येत आहे. आणि ही सर्व केंद्रे महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस ही संकल्पना राबविताना प्रत्येक वस्तू जेम्समार्फतच खरेदी करणे, आधार बेस बायोमेट्रिक हजेरी या उपक्रमामुळे जनतेला प्रभावी व परिणामकारक सेवा उपलब्ध होत असल्याचे आशुतोष सलील यांनी सांगितले.

Mudgal

सुलभ नागरी सेवा या नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमाबद्दल सांगताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, प्रशासनामध्ये जबाबदारी स्वीकारुन जनतेला सेवा देण्याचा प्रभावी उपक्रम राबविताना गतिमान प्रशासन ही संकल्पना समोर ठेवून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यासाठी प्रशासनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे. नागपूर शहरासंदर्भातील संपूर्ण माहिती डिजिटलायझेशन झाल्यामुळे मालमत्ता करासह इतर सेवा अधिक परिणामकारक पद्धतीने अंमलबजावणी करणे सुलभ झाले आहे. सामान्य माणूस सुद्धा मालमत्ता कर स्वत: निश्चित करुन त्यानुसार कर भरु शकतो.

स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना स्वच्छ नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने स्वच्छता ॲप तयार करण्यात आला आहे. त्यामुळे कचऱ्याची व्याख्या ठरविण्यात आली. तसेच 90 टक्केपेक्षा जास्त तक्रारी सोडविणे यामुळे शक्य झाले आहे. प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्यासोबत चांगले आरोग्य देण्यासाठी आधार लिंक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने जेवढी हजेरी तेवढा पगार ही संकल्पनासुद्धा राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर मेट्रोसंदर्भात सांगताना उप महाव्यवस्थापक अनिल कोकाटे म्हणाले की, महामेट्रोच्या माध्यमातून नागपूर व पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. नागपूर मेट्रोची प्रगती संदर्भात प्रशासन, पोलिस व जनतेचे सहकार्य मिळत असल्यामुळे 60 टक्केपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. ग्रीन मेट्रो ही संकल्पना साकारुन पर्यावरण व ऊर्जेच्या बचतीला प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आयकर विभागाचे आयुक्त संदीप बंधू यांनी आयकर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची तसेच आयकर भरणा करण्यासाठी अत्यंत सुलभ व पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण-पूर्व रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम आशुतोष श्रीवास्तव यांनी रेल्वे प्रवाशांना प्रभावी व परिणामकारक सेवा देताना माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्य स्थितीत सुद्धा आयआरसिटीद्वारे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ॲप येत असल्याचे सांगितले. ऑनलाईन सातबारा संदर्भात महसूल उपायुक्त सुधारक तेलंग तर समृद्धी महामार्गासंदर्भात निशिकांत सुके यांनी यावेळी सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे संचालन उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाय यांनी तर आभार उपायुक्त संजय धिवरे यांनी मानले.