Published On : Sun, Oct 31st, 2021

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला ‘सोबतीचा’ विश्वास

Advertisement

सोबतच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

नागपूर : कोरोनाच्या कठीण काळात घरातील आधार गमावल्यानंतर या परिवारांना सोबतीचा खरा आधार देणाऱ्या ‘सोबत पालकत्व प्रकल्पाला’ नागपूर शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनीआवश्यक त्या सर्व सॊबतीचा विश्वास दिला.

श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारा संचालित सोबत पालकत्व प्रकल्पाद्वारे रविवारी (ता.३१) लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक लॉनजवळील लक्ष्मीनगर मैदानात ‘सोबत’ने पालकत्व स्वीकारलेल्या परिवारांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर.विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट दिली. यावेळी सोबत पालकत्व प्रकल्पाचे अध्यक्ष माजी महापौर तथा संदीप जोशी उपस्थित होते.
यावेळी सोबत प्रकल्पाचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने सोबत पालकत्व प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या २६३ परिवारांना अन्नधान्याचे किट, दिवाळीचा फराळ, रांगोळी, दिवे आदी देण्यात आले.

मागील वर्षी कोरोनाचे संकट असले तरी घरीच साधेपणाने साजरी करण्यात आलेल्या दिवाळीत प्रत्येक घरात आनंद होता. मात्र यावर्षी तो आनंद साजरा करण्याचे कारणच नियतीने हिरावून घेतले आहे. घरातील कर्ता पुरूष, महिला गेल्याने अनेक चिमुकले आई, बाबा किंवा दोघांनाही पोरके झाले आहेत. अशा स्थितीत नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी पुढाकार घेत या कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारत ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाद्वारे जबाबदारी स्वीकारलेल्या परिवारांसोबत दिवाळीच्या आनंदाचे क्षण वाटून घेण्याचा निर्धार केला. शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या या उवक्रमाचे कौतुक करीत प्रशासनाद्वारे आवश्यक ती सर्व मदत करण्याचा विश्वास दिला.