Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 9th, 2020

  आदित्य ठाकरे मनपा आयुक्तांची केली प्रशंसा

  नागपूर :- नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राखण्यासाठी आणि मृत्यू दर कमीत-कमी ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री मा श्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांची मनापासून प्रशंसा केली.

  श्री. आदित्य ठाकरे गुरुवारी सकाळी नागपूर, नाशिक आणि औरंगाबादच्या मनपा आयुक्तांसोबत कोरोनावर प्रभावी ‍नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने चर्चा करत होते. श्री. ठाकरे म्हणाले की, नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका आणि नावीन्यपूर्ण उपाय करुन कोरोनाचे प्रभावी नियंत्रण केले. त्यांनी काँटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग आणि शीघ्र उपचाराची व्यवस्था केली. त्यांनी सांगितले की, आता राज्याच्या इतर ठिकाणी सुध्दा कॉटॅक्ट ट्रेसिंगवर जोर दिल्या जात आहे. महानगरपालिकेने घरोघरी सर्वेक्षण, समूह विलगीकरण रणनितीवर जास्त भर दिला पाहिजे, असेही ना. आदित्य ठाकरे म्हणाले.

  मनपा आयुक्त श्री. मुंढे यांनी नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, कोरोनाशी लढण्यासाठी शासनाच्या दिशानिर्देशाच्या अधीन राहून महानगरपालिकेने “कोरोना वार रुम” मध्ये तज्ञांशी दररोज चर्चा करुन नवीन-नवीन उपाय योजनांचा शोध घेतला. कुठलीही वेळ वाया न घालवता या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन कोविड-१९ चा प्रसार प्रभावीपणे रोखला.

  महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमधील खाटांची संख्या ५०० पर्यंत नेली आणि खासगी रुग्णालयांनासुद्धा कोविड-१९ च्या रुग्णांसाठी तयारी ठेवण्याचे निर्देश दिले. केंद्र शासनाच्या पथकाने सुध्दा नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमाने केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे.

  नागपुरात मनपाच्या माध्यमाने घरोघरी सर्वेक्षण, गरोदर स्त्रिया, टी.बी. रुग्ण, कुष्ठरोगी, कर्करोगी रुग्णांची विशेष तपासणी आणि विशेष काळजी घेण्यात आली. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली. कोरोना कंट्रोल रुमच्या माध्यमाने पण रुग्णांची माहिती मिळवण्यात मदत झाली. लॉकडाऊनच्या काळात १२००० नागरिकांचे मानसिक समुपदेशन करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

  श्री. आदित्य ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिकेव्दारे कळमेश्वर येथील राधास्वामी सत्संग ब्यास येथे उभारण्यात आलेल्या पाच हजार खाटांच्या कोविड केअर सेंटरची सुध्दा प्रशंसा केली. श्री. मुंढे यांनी सांगितले की, ५०० खाटा तयार आहेत आणि जर आवश्यकता भासली तर त्याची क्षमता ५००० पर्यंत केली जाऊ शकते.

  आयुक्तांनी सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि नाईक तलाव येथील घनदाट वस्तीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची चर्चा केली. त्यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांकडून सुध्दा सारी रुग्णांची माहिती घेतली जाते. जर त्यांचा स्वॅब टेस्ट पॉजिटीव्ह निघाला तर त्यांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते.

  श्री. तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला अद्ययावत रुग्णवाहिका (लाईफ सर्पोट एम्बुलेंस) देण्याची विनंती केली. श्री. ठाकरे यांनी या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145