Published On : Thu, Jul 2nd, 2020

जम्मू-काश्मीरचा 25 वर्षाचा विकास आराखडा तयार व्हावा : नितीन गडकरी

Advertisement

‘एमएसएमई मार्फत रोजगाराच्या संधी‘ यावर ई संवाद

नागपूर: जम्मू आणि काश्मीरचा येत्या 25 वर्षाचा विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. या आराखड्यानुसार या राज्याची प्रगती आणि रोजगार निर्मितीसाठी काम करावे लागणार आहे. या भागातील तज्ञांनी असा आराखडा तयार केल्यास केंद्र शासनातर्फे मदत केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

‘एमएसएमई मार्फत रोजगाराच्या संधी‘ या विषयावर ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुणांना संबोधित करीत होते. जम्मू काश्मीर हे विश्वातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. या भागाच्या विकासासाठी केंद्र शासन कटिबध्द असून तसे प्रयत्नही सरकारचे सुरु आहेत. विकासात आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मिती या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. आर्थिक प्रगतीचा संबंध उद्योग व्यवसायांशी आहे. उद्योग व्यवसाय वाढला तर रोजगार वाढेल. रोजगार वाढला तर गरिबी संपेल. जम्मू काश्मीरमध्ये कोणती अर्थव्यवस्था विकसित होणार यावर केंद्र शासन विचार करीत आहे, असेही ना. गडकरी यावेळी म्हणाले.

ग्रामीण भागातील उद्योगांची अर्थव्यवस्था 88 हजार कोटींची आहे. ही अर्थव्यवस्था 5 लाख कोटींपर्यंत नेण्याचे आमचे प्रयत्न असून यासाठीच आम्ही अ‍ॅग्रो एमएसएमईची संकल्पना पुढे आणली असल्याचे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरमध्ये कोणती उत्पादने चांगली होऊ शकतात, त्याचे डिझाईन, त्याला मिळणारा बाजार यावर उद्योगांची यशस्वीता अवलंबून आहे. दर्जेदार उत्पादन, चांगले डिझाईन आणि सुंदर पॅकेजिंग व नंतर त्याचे मार्केटिंग करावे लागणार आहे. जम्मू काश्मीरची क्षमता पाहून विकासाची संकल्पना ठरवावी लागेल. उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून, नवीन संशोधन, कौशल्य, यशस्वी प्रयोग या सर्वांचा उपयोग करून तेथील उद्योगांचा विकास करता येईल. यासाठी विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. पश्मिना शाल व खादी ग्रामोद्योगाच्या रुमालाचे उदाहरण यावेळी ना. गडकरी यांनी बोलताना दिले.

अप्रतिम दर्जाचे मध जम्मू काश्मीरमध्ये उपलब्ध आहे. मध उद्योगाचे क्लस्टर तेथे तयार व्हावेत, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- मधाचा प्रचार करा. साखरेऐवजी मधाचा वापर करण्याचा प्रचार करता येईल. मधापासून बिस्किट बनवले तर त्याला खूप मागणी मिळेल. काश्मीरचे मध अत्यंत चांगल्या दर्जाचे आहे. योग्य प्रचार आणि दर्जेदार उत्पादनामुळे मध आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचू शकते. मातीच्या आकर्षक भांड्यांची कला तेथे विकसित होऊ शकते. सोलर चरखा, फर्निचर, बांबूची उत्पादने अशी उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. कोणत्या नवीन योजना तयार होऊ शकतात याचा अभ्यास केल्यास आपण मदत करण्यास तयार असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.