Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Mar 23rd, 2021

  बांबूची अर्थव्यवस्था 30 हजार कोटींची बनविण्याचे प्रयत्न : ना. गडकरी

  आयएफजीईचे बांबूवरील आभासी प्रदर्शन

  नागपूर: बांबूपासून अनेक प्रकारचे साहित्य बनविले जात आहे. अगरबत्तींच्या काड्या, फर्निचर, कापड, बायो इथेनॉल आणि बांधकाम क्षेत्रातही बांबूचा मोठ्या प्रमाणात होणारा उपयोग लक्षात घेता भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था ही 30 हजार कोटींची बनू शकते असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

  इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) तर्फे बांबू तंत्रज्ञान, साहित्य आणि सेवा या विषयावरील आभासी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. बांबूची विकसनशील प्रक्रिया आता गती घेत असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- बांबूच्या आपल्याकडे 180 जाती आहेत. चीनमध्ये त्या 360 आहेत. पण आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीने कोणती जात आवश्यक आहे, त्यावर संशोधन करून त्या जातीच्या बांबूची लागवड झाली पाहिजे. बांबूपासून आकर्षक साहित्य बनविले जाते. या साहित्याची मागणी वाढवली तर बांबूची लागवड आणि उत्पादन वाढेल. न्यूज प्रिंटसाठी लागणारा बांबू आपल्याला आयात करावा लागतो. या बांबूची लागवड देशात करून न्यूज प्रिंटची आयात कमी करता येऊ शकते काय, यावर अभ्यास करणे आवश्यक आहे.

  https://fb.watch/4prDqDqwzb/

  उत्तर-पूर्व भारतातील राज्यांमध्ये बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या बनविण्याचा उद्योग आहे. या भागातून 4 हजार टन काड्या देशाच्या विविध राज्यांमध्ये पाठविल्या जाऊ शकतात, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- या काड्या बनविताना बांबूपासून निघणार्‍या कचर्‍यापासून ‘ऑरगॅनिक कार्बन’ बनविता येतो. हा ऑर्गेनिक कार्बन शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला आहे. यामुळे शेतकर्‍याचे ÷उत्पन्न अनेक पटींनी वाढल्याचे सिध्द झाले आहे. तसेच बांबूच्या (वेस्ट) कचर्‍यापासून बायो इथेनॉल बनते. उत्तर पूर्व राज्यांमध्ये बायो इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प सुरु होऊ शकतात. इंडियन ऑईल कंपनीने या भागात बायो इथेनॉलचा एक प्रकल्प सुरु केला आहे. गुजरातमध्ये एका कंपनीने बांबू आणि कॉटन मिळून सुंदर कापड तयार केले आहे.

  तसेच महामार्ग बांधताना रस्त्याशेजारी ‘क्रॅश बॅरियर’साठी बांबूचा उपयोग भविष्यात होणार आहे. बांबूच्या अशा सर्व उद्योगांना एमएसएमईतर्फे प्रोत्साहन आणि मदत करण्याची आमची भूमिका असून भविष्यात बांबूची अर्थव्यवस्था 30 हजार कोटींची बनविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145