Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Aug 6th, 2020

  सार्वजनिक जलद वाहतुकीसाठी ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ देशाची गरज : नितीन गडकरी

  ‘ई मोबिलिटी’ विषयावर ई संवाद

  नागपूर: देशातील सार्वजनिक जलद वाहतुकीसाठी ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’ आणि जैविक इंधन ही आज देशाची गरज आहे. या उपायामुळेच क्रूड ऑईल आयात खरेदीसाठी देशावर येणारा आर्थिक भार कमी होईल व सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देश स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

  इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्सतर्फे आयोजित एका चर्चेत ना. गडकरी बोलत होते. वाहतुकीसाठी लागणार्‍या इंधनापैकी आज 70 टक्के क्रूड ऑईल आयात करावे लागते. त्यामुळे निर्माण होणार्‍या कार्बन डायऑक्साईचे प्रमाणही वाढते. 18 टक्के कॉर्बन डायऑक्साईड राष्ट्रीय महामार्गांवर चालणार्‍या वाहनांमुळे निर्माण होतो. जैविक इंधन किंवा इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर झाला नाही, तर हे प्रमाणात भविष्यात वाढणार. इलेक्ट्रिकवर चालणारी प्रवासी वाहने ही इंधनासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी, प्रदूषण न करणारी शाश्वत वाहतूक प्रदान करणारी आहे, असेही ते म्हणाले.

  ब्रॉडगेज मेट्रोसंदर्भात बोलताना ना. गडकरी म्हणाले- ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पना नागपुरात राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी इलेक्ट्रिफिकेशन तयार आहे, रेल्वे रुळही आहेत, स्टेशनही तयार आहे. एक्सप्रेस 60 किमी प्रतितास वेगाने धावते, पॅसेंजर 40 किमी प्रतितास वेगाने धावते, तर ब्रॉडगेज मेट्रो 120 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. नवीन तंत्रज्ञानाने हे शक्य झाले आहे. पॅसेंजर आणि एक्सप्रेससाठी ब्रॉडगेज मेट्रो हा योग्य पर्याय होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

  महानगरांमधील सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक बसेस किंवा सीएनजी, एलएनजी इंधनाचा वापर व्हावा, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, बंगलोर-चेन्नई, दिल्ली-जयपूर अशा वाहतुकीसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा वापर व्हावा. यामुळे इंधनाच्या खर्चात प्रचंड बचत होईल आणि ही प्रदूषणमुक्त वाहतूक असेल. लंडनमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी जे मॉडेल वापरले जाते, ते मॉडेल आपल्या देशातही वापरण्याची गरज आहे. आज देशात विविध प्रकारांनी जैविक इंधन बनविण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. जैविक इंधननिर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध आहे, त्याचा वापर झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

  इलेेक्ट्रिक दुचाकी वाहनांना टॅक्सीची परवानगी मिळाली, तर ग्रामीण भागात एका व्यक्ती प्रवासासाठी दुचाकीचा उपयोग होऊ शकतो. यामुळे एका व्यक्तीसाठी ट्रॅक्सीसारखे मोठे वाहन वापरण्याची गरज नाही. तसेच दुचाकीला परवानगी मिळाली तर रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होईल. इलेक्ट्रिक वाहने आपल्या घरीच चार्ज करण्याची व्यवस्थाही होईल. अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापुढे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि शाश्वत वाहतूक प्रदान करणार्‍या ई व्हेईकलच देशात अधिक वापराव्या लागतील,असेही ना.गडकरी म्हणाले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145