Published On : Sun, Feb 21st, 2021

‘आयआरसी’ने रस्ते बांधकामात नवीन तंत्रज्ञान व संशोधनाचा वापर करावा : ना. गडकरी

Advertisement

‘आयआरसी’ची बैठक


नागपूर: सिमेंट आणि स्टीलचे भाव पाहता रस्ते आणि पुलांच्या बांधकामात दर्जा उत्तम ठेवून पर्यायी वस्तूचा वापर व्हावा. तसेच इंडियन रोड काँग्रेसने (आयआरसी) बांधकामासाठी नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे मत राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

इंडियन रोड काँग्रेसच्या एका बैठकीत ते पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करीत होते. या बैठकीसाठी केंद्रीय महामार्ग राज्यमंत्री डॉ. व्हि. के. सिंग, आयआरसीचे अध्यक्ष सी. पी. जोशी, आय. के. पांडे, एस. के. निर्मल, एच आर रहेजा आदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- मार्चपर्यंत 40 किमी दर दिवशी या गतीने महामार्ग प्राधिकरणाचे रस्ते बांधकाम सुरु आहे. ही ऐतिहासिक उपलब्धी आहे. या कामाचे श्रेय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आहे. खर्च कमी करून रस्ते आणि पुलाच्या बांधकामाचा दर्जा अधिक उत्तम कसा राखता येईल, यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन केले जावे.

रस्ते आणि पुलांचे बांधकाम करताना लागणारी माती आणि मुरुम यासाठी बुलडाणा पॅटर्नप्रमाणे नाल्यांचे खोदकाम करून जलसंधारणाचे काम करावे. अनेक राज्यांमध्ये पाणीटंचाई ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. जलसंधारणाचे काम झाले तर पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

रस्ते बांधकाम करताना स्टील आणि सिमेंटचे भाव एक आव्हान निर्माण झाले असल्याचे सांगत ना. गडकरी म्हणाले- बांधकामात स्टील फायबरचा वापर करण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यामुळे बांधकामासाठी येणारा खर्च कमी होणार आहे. सिंथेटिक फायबरचा रस्ते आणि पुलाच्या बांधकामात वापर हाही एक पर्याय समोर आला आहे. तसेच 10 टक्के रबर आणि प्लास्टिकचा वापर झाला, तर पर्यावरण संतुलन आणि प्रदूषण कमी करणे शक्य होईल. यासाठी आवश्यक तंत्ऱज्ञान उपलब्ध आहे. ते आयआरसीने स्वीकारले पाहिजे, असेही ना. गडकरी म्हणाले.

रस्ता सुरक्षा आज मोठी समस्या झाल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- दरवर्षी 5 लाख अपघातात 1.5 लाख व्यक्ती मृत्युमुखी पडतात. यासाठी रोड इंजिनीरिंग करण्याची व अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्याची आवश्यकता आहे. रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनविताना ही काळजी घेतली तर लोकांचे जीव वाचतील. पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आणि वेळेत काम ही पध्दती आयआरसीने अवलंबावी. यासोबतच कामगिरीचे अंकेक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक व्हावी यासाठी आपले काम चांगले असावे. उत्तम पायाभूत सुविधा उभारल्याशिवाय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होणार नाही, असेही ते म्हणाले.