Published On : Wed, Sep 15th, 2021

विदर्भ विकासासाठी व्हीएनआयटी विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा उपयोग व्हावा

व्हीएनआयटीच्या 19 व्या दीक्षांत समारंभात ना. गडकरी

Addressing 19th Convocation Programme of VNIT, Nagpur

नागपूर: व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यानी नैसर्गिक संपत्तीची भरभराट असलेल्या विदर्भाच्या तसेच आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास भागाच्या विकासासाठी नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्यामुळे मागास भागातील गरिबी, बेकारी दूर होईल, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूरच्या व्हीएनआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 19 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ना. गडकरी आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलत होते. याप्रसंगी सीएसआयआरचे संचालक डॉ. शेखर मांडे, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. पी. एम. पडोळे, रजिस्ट्रार डॉ. एस. आर. साठे उपस्थित होते. व्हीएनआयटी या संस्थेने उल्लेखनीय यश मिळविले आहे. आयआयटीच्या दर्जाचे हे महाविद्यालय असल्यामुळे या संस्थेला राष्ट्रीय महत्त्व असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- संशोधनाच्या माध्यमातून कृषी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्राच्या कल्याणासाठी काम करणे गरजेचे आहे. विदर्भात आज 80 टक्के खनिजे आहेत, 80 टक्के जंगलसंपत्ती आहे. या नैसर्गिक संपदेचा विदर्भाच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल, याचा विचार संस्थेने कराला. बांबूवर व्हीएनआयटी काम करीत आहेच. ज्ञान ही शक्ती आहे. हेच ज्ञान समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचते करता येईल, यावर अभ्यास करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

विदर्भात हजारो मालगुजारी तलाव आहेत. या तलावांच्या माध्यमातून शेतीची सिंचन क्षमता वाढू शकते. मोठ्या प्रमाणात विदर्भात तांदळाचे उत्पादन होते. यातून विदर्भाचा विकास कसा करता येईल, याबद्दल विद्यार्थ्यांनी संशोधन करावे. हे संशोधन विद्यार्थ्यांच्या, शासनाच्या व संस्थेसाठी कायम उपयोगी ठरेल, असा विश्वास व्यक्त करून ना. गडकरी म्हणाले- जैविक इंधनाचा वापर हे देशाचे भविष्य आहे. सांडपाण्यातून जैविक इंधन कसे निर्माण करता येईल, यावर या विद्यार्थ्यांनी संशोधन करावे. आज स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्यानंतरही आपल्याला कृषी, ग्रामीण व आदिवासी भागात बेरोजगारी आणि दारिद्य्राचा सामना करावा लागत आहे. विकासाचा असमतोल आणि सामाजिक विषमतेसारखी आव्हाने देशासमोर आहेत. अशा स्थितीत आनंदी, समृध्द, नावीन्यपूर्ण आणि शांतीपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि मानवतेने हात पुढे केले पाहिजे.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान आणि कौशल्य समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- बहुतेक लोक शिकतात, पदवी मिळवितात, कमावतात, लग्न करतात आणि कुठे तरी सेवा करतात. योग्यता असलेले काही पुरुष व स्त्रिया मात्र भविष्यातील पिढीसाठी प्रेरणादायक असतात. व्हीएनआयटीचे विद्यार्थी भविष्यातील तंत्रज्ञ आणि अभियंता आहेत. तेच खरे भारताचे भाग्यविधाता आहेत. त्यांनीच जगाला वसुधैव कुटुंबकमसारखे उदात्त विचार शिकवले असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.