Published On : Tue, Aug 3rd, 2021

अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांना भावपूर्ण निरोप

Advertisement

नागपूर: कोरोनामधील संकटप्रसंग असो अथवा प्रशासनामध्ये येणारे अडथळे असोत अशा प्रत्येक वेळी दिलेले काम असो ते हसून स्वीकारणे आणि ते वेळेत आत्मविश्वासाने पूर्ण करणे हा स्वभाव आणि कर्तव्यातील हातोटी असलेला अधिकारी म्हणजे नागपूर महानगरपालिकेचे मावळते अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे होत. आपल्या कार्यशैलीने त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांची मने जिंकली. सेवानिवृत्तीमुळे पुढील कार्यकाळात अशा अधिका-याची अनुपस्थिती महानगरपालिकेला नक्कीच जाणवेल, असे प्रतिपादन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे स्वेच्छानिवृत्ती सत्कार समारंभात ते बोलत होते. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमाला आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, विजय देशमुख, रवींद्र भेलावे, राजेश भगत, उपायुक्त मिलींद मेश्राम, अशोक पाटील, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, मनोज तालेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, कार्यकारी अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) महेश धामेचा, निगम सचिव डॉ.रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, नोडल अधिकारी (स्वच्छता) डॉ.गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता अजय मानकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, उपअभियंता राजेश दुफारे आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांचा शाल, मनपाचा मानाचा दुपट्टा, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देउन सत्कार केला. अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, राम जोशी यांनीही तुळशीरोप देउन संजय निपाणे यांना सन्मानित केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, नागपूर महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हा परिस्थिती भीषण होती. अशा स्थितीत संजय निपाणे यांच्याकडे काही जबाबदा-या सोपविल्या. शांतपणे संपूर्ण टीमकडून योग्य पाठपुरावा करीत अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी केलेल्या कार्यामुळे आपलाही विश्वास वाढत गेला व पुढे कार्य करण्यात सर्व अधिका-यांचीही मोठी मदत घेता आली, अशी आठवणही आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितली.

प्रशासनामध्ये ‘कम्फर्ट झोन’ निर्माण करणारे अधिकारी फार कमी असतात. त्यापैकीच एक संजय निपाणे हे आहेत. प्रत्येक काम योग्य नियोजनाद्वारे ‘परफेक्शनने’ करणारे ते अधिकारी आहेत. निवृत्तीनंतरची पुढील इनिंगही ते तेवढ्याच परफेक्शनने करतील, असा विश्वासही त्यांनी केला.

अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा यांनी संजय निपाणे यांच्या कार्याचे कौतुक करीत पुढील कामातही त्यांच्या यशाची श्रृंखला कायम रहावी, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी संजय निपाणे यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. नोकरीपूर्वीच त्यांच्यासोबत परिचय असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.

डीएनए शेतक-याचा; पुढे शेती करणार : अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे
१९९६ला एमपीएससी मधून प्रशासकीय सेवेत रूजू झाल्यानंतरच ठरविले होते, की पन्नाशी ओलांडली की निवृत्ती घ्यायची. इंजिनिअरींगचे शिक्षण घेउन खासगी नोकरी केली. पुढे अपघाताने एमपीएससी करायचा विचार डोक्यात आला त्यात एकाच वर्षात यश संपादित करून प्रशासकीय सेवेचा सुरू केलेला प्रवास आता थांबतो आहे. पुढील इनिंग आता शेतीमध्ये रमणार आहे. कोरोनाच्या काळात आपल्या गावाकडील लोकांचा मृत्यू होत असताना आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नसल्याची खंत होती. आता आपल्या लोकांसोबत राहून त्यांच्यासाठी काही करण्याचा प्रयत्न करणार. हाडाचा शेतकरी आहे, शेती आपल्या डीएनए मध्येच असल्यामुळे आता पुढे शेतीच करणार, असे प्रतिपादन निवृत्तीपर सत्कारप्रसंगी मावळते अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी केले.

प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना अनेक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासोबतचा अनुभव हा नेहमी लक्षात राहणारा आहे. शहरात निर्माण झालेली परिस्थिती हाताळणे असो किंवा तात्काळ निर्णय घेउन तो जलदगतीने अंमलात आणणे असो अशा अनेक प्रसंगी बरेच काही शिकण्याची संधी आयुक्तांकडून मिळाली. निवृत्तीच्या प्रसंगी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सत्कार होणे ही आयुष्यातील कमाई असल्याची भावनाही संजय निपाणे यांनी व्यक्त केली.

याशिवाय उपायुक्त रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ.श्वेता बॅनर्जी यांनीही अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना पुढील कारकिर्दीकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन सहा.आयुक्त महेश धामेचा यांनी केले.