Published On : Fri, Nov 15th, 2019

सोशल मिडिया वापरकर्त्यांना भावनिक उद्रेकाचे व्यसन : अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक.

लाईक्स, कमेंट्स ची अनुभूती मादक द्रव्यांसारखीच.

नागपूर: सोशल मिडियावर भावनिक उद्रेकास्पद ‘पोस्ट’ वापराचा सुळसुळाट झाला असून प्रत्येक वयोगटातील महिला, पुरुष आहारी गेल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडियाची सवय आता व्यवसानाधीनतेकडे वळली असून ‘लाईक्स’, ‘ईमोजी’चे जाळे भयावह झाले आहे.

यामुळे त्यांची महत्त्वाची कामे बाधित होत आहे. सोशल मिडियावरील अपेक्षित प्रतिक्रियेने तरुणाईच्या चेहऱ्यावरील आनंदलहरी मादक पदार्थ सेवन केल्याप्रमाणेच असल्याने या व्यसनावर आळा घालण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.

गेल्या दशकभरात सोशल मिडिया लोण घराघरात पोहोचले असून आता नकारात्मक परिणाम पुढे येऊ लागले आहे. सध्या बहुसंख्या नागरिक सोशल मिडियाचा वापर एका मर्यादेपर्यंत करीत असले तरी व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोशल मिडिया वापराच्या अनियंत्रित इच्छेमुळे तरुणाई त्यावर महत्त्वाचा वेळ खर्ची घालत असून त्यांच्या कारकिर्दीवरही परिणाम होत असल्याचे निरीक्षण सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नोंदविले आहे. सोशल मिडियावर थोडा वेळ घालून ‘मूड फ्रेश’ करण्याची कृती विकृतीकडे जात आहे.

सोशल मिडियावरील स्वतःच्या पोस्टवर ‘लाईक्‍स’, सकारात्मक भावना दर्शविणारे ‘इमोजी’ बघितल्यानंतर वापरकर्त्यांत ज्या आनंदलहरी तयार होतात, त्या आनंदलहरी मादक पदार्थ घेतल्याप्रमाणेच असतात, असा अभ्यास हार्वर्ड विद्यापीठाच्या अहवालात नोंदविण्यात आला असल्याचे पारसे म्हणाले. कोकीन इतर मादक पदार्थ घेतल्यानंतर मेंदूत डोपामाईन तयार होतो व एका विशिष्ट भागातील न्यूरॉन्स सक्रिय होतात. त्यातून आनंदलहरी तयार होतात. असाच प्रकार सोशल मिडियाच्या वापरकर्त्यांमध्ये दिसून येत असून हे अनियंत्रित झाल्यास एकप्रकारचे व्यसन आहे.

एखाद्या व्यक्तीला एखादे नोटीफिकेशन प्राप्त झाल्यानंतर तेव्हा मेंदूत डोपामाईन तयार होऊन उत्तेजना वाढते, असेही या अभ्यासात म्हटले आहे. यातूनच सोशल मिडियाचा वापर करण्यास कळत-नकळत तरुणाई भाग पडत असून ते व्यसनाधीनतेकडे जात आहे, असे पारसे म्हणाले. त्यामुळे आता कार्पोरेट कंपन्यांनी सोशल मिडियाच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी व्यावसायिक चिकित्सक कार्यक्रम सुरू केला आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय संस्था कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या भावनांना आवर घालण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्र सुरू केले आहे. यालाच ‘डिजिटल डिटॉक्‍स’ असे म्हटले जात आहे. सोशल मिडियाच्या अति नकारात्मक वापरामुळे आता ‘सोशल मिडिया ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑडर’ या नवीन शब्दाचा, किंबहुना आजाराचा उदय झाला, असे पारसे यांनी सांगितले.

कशी ओळखावी व्यसनाधीनता ?
एखादा तरुण किंवा तरुणी सातत्याने सोशल मिडियाचाच विचार करीत असेल किंवा ते वापरण्यावर वेळ खर्ची घालत असेल, सोशल मिडियाच्या वापरावर नियंत्रण राखू शकत नसेल, वैयक्तिक समस्या विसरण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करीत असेल, सोशल मिडियाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करूनही ते शक्‍य होत नसेल, वापर न केल्यास अस्वस्थ वाटणे, नोकरी, अभ्यासावर परिणाम होणे, यापैकी तीन वैशिष्ट्ये आढळून आल्यास व्यसन लागल्याचेच द्योतक असल्याचे अजित पारसे यांनी सांगितले.

तरुणाईत सोशल मिडियाची व्यसनाधीनता वाढत असून ते टाळण्यासाठी स्मार्टफोन किंवा संगणकावरील वेळ कमी करण्याची गरज आहे. तासभर विविध साईट्‌स तपासून त्याकडे दुर्लक्ष केल्यास व्यसनाधीनतेवर आळा घालता येतो. याशिवाय जेवणाच्या वेळी फोन दूर ठेवणे, झोपताना दुसऱ्या खोलीत फोन सोडणे आवश्‍यक आहे. समाजातील विविध गटात सामील होऊन परस्पर संवाद वाढवून नेटवर्किंग साईटवरील वेळ कमी करणे शक्‍य आहे.

अजित पारसे, सोशल मिडिया विश्‍लेषक