मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील घरात घुसून एका चोरट्याने अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सैफवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी सैफसह त्याच्या कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते. अभिनेत्यावर हल्ला करून चोरट्यांनी पळ काढला.
आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे टीम्स बनवले आहेत. सैफ अली खानला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली.
सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत.
एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देणार असल्याचे लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी सांगितले.