Published On : Tue, Sep 21st, 2021

‘स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाच्या आयोजनात प्रत्येक विभागाचा सक्रीय सहभाग ठेवा – विभागीय आयुक्त

नागपूर : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अमृतमहोत्सवी उपक्रमाचे आयोजन देशभर केले जात आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक विभागाने राज्य शासनाने निर्धारित केलेल्या स्वरूपानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे. प्रत्येक विभागाचा यामध्ये सक्रिय सहभाग असावा, अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी आज येथे केल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज यासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये या उपक्रमासंदर्भात राज्य शासनाने निर्धारित केलेल्या स्वरूपाचे सादरीकरण झाले. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला,वनामतीच्या संचालक डॉ. माधवी खोडे, याशिवाय महानगरपालिका व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 मार्चपासून साबरमती येथून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची घोषणा केली होती. यावेळी विविध विभागाने आतापर्यंत आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात नागपूर विभागात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम, वेगवेगळ्या विभागाने पार पडायच्या जबाबदारीचाही आढावा घेण्यात आला.

नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, आदिवासी विभाग, महानगरपालिका, आदी संस्थामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू असून पुढील वर्षभरातील नियोजनही या वेळी सादर करण्यात आले.

15 ऑगस्ट 2022 पर्यंतच्या 75 आठवड्यात 75 कार्यक्रमांचे आयोजन. तद्नंतर 2023 पर्यंत या संकल्पनेची व्याप्ती वाढविणे, असे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकार, सर्व राज्य, सर्व केंद्रशासित प्रदेश, यांच्या स्तरावर या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम, विशेष दिन असणाऱ्या तारखांना विशेष कार्यक्रम करण्याचे निर्देश केंद्र शासनाचे आहेत. राज्यामध्ये 12 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यातील महोत्सवाला सुरुवात झाली आहे.

विदर्भ आणि स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती जागविण्यासाठी शक्य आहेत. त्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच स्वातंत्र्य लढ्यामध्ये नागपूर व विदर्भाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या घटनांना नव्या पिढीसाठी त्यांना समजेल अशा माध्यमांद्वारे मांडण्यात यावे, अशा सूचना या वेळी विभागीय आयुक्तांनी केल्या.