Published On : Thu, Aug 1st, 2019

जाहिरात करणा-या रुग्णालयांवर होणार कारवाई

पीसीपीएनडीटी समितीचा निर्णय

नागपूर : पीसीपीएनडीटी कायद्यानुसार रुग्णालयांमार्फत करण्यात येणा-या जाहिरातींबाबत नियम तयार करण्यात येत आहे. मात्र खासगी रुग्णालयांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. याबाबत दखल घेउन पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करुन जाहिरात करणा-या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचा निर्णय पीसीपीएनडीटी समितीमार्फत घेण्यात आला आहे.

व्हीआयपी मार्गावरील मनपाच्या डिक दवाखान्यामध्ये गुरूवारी (ता.१) पीसीपीएनडीटी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनपाच्या प्रभारी आरोग्य उपसंचालक व नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे होत्या. यावेळी पीसीपीएनडीटी च्या सदस्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. वर्षा ढवळे, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, रेडिओलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत ओंकार, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.

पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रकरण ८ च्या अनुच्छेद २२ नुसार जाहिरातीसंबंधी नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. काही रुग्णालय तर शुल्कामध्ये सुट देण्याच्या जाहिराती करीत आहेत. हे नियमाच्या विरुद्ध असून अशा रुग्णालयांवर तात्काळ प्रतिबंध लावून नोटीस बजावण्याचा प्रस्ताव बैठकीमध्ये पारित करण्यात आला.

पीसीपीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नियमानुसार सोनोग्रॉफी सेंटरमध्ये तपासणीनंतर ‘फॉर्म एफ’ भरणे आवश्यक आहे. मात्र ते भरून घेतले जात नाही. ‘फॉर्म एफ’ न भरणा-या सोनोलॉजिस्टवरही कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय निरुपयोगी सोनोग्रॉफी मशीन वैज्ञानिक पद्धतीने नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र याबाबतही कार्यवाही होत नसल्याने सर्व केंद्रांनी जुन्या, बेकार, निरुपयोगी सोनोग्रॉफी मशीन मनपा पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे जमा करणे व न करणा-यांवर कारवाई करण्याचाही निर्णय समितीच्या वतीने यावेळी घेण्यात आला.

सल्लागार समितीने ७ नवीन सोनोग्रॉफी केंद्र सुरू करणे व ९ केंद्रांचे नुतनीकरण करण्याला बैठकीत मंजुरी दिली. डॉ. भावना सोनकुसळे यांना आरोग्य उपसंचालक पदाचा कार्यभार सोपविल्याबद्दल पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले.