मुंबई: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राज्यातील तब्बल २,२८९ महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी अयोग्यरीत्या या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले असून, या सर्व लाभार्थींना दिला जाणारा मासिक ₹१५०० चा भत्ता तात्काळ थांबवण्यात आला आहे. यामुळे सरकारी तिजोरीला ३ कोटी ५८ लाख रुपयांचा फटका बसला आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती स्पष्ट केली. “या प्रकरणात चौकशी सुरू असून, नियमबाह्य लाभ घेणाऱ्या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल आणि चुकीने घेतलेली रक्कम शंभर टक्के वसूल केली जाईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
गरजूं महिलांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहोचवण्याचा हेतू असलेली ही योजना, आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या गैरवापरामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यामध्ये योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये त्रुटी असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे शासनाने आता डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक काटेकोर करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, निवडणूकपूर्वी महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली ही योजना आता पारदर्शकतेच्या कसोटीवर तपासली जात आहे. प्रामाणिक लाभार्थ्यांमध्ये नाराजी असून, शासनाच्या तात्काळ हालचालींमुळे प्रशासनाची जबाबदारी जपण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.