नागपूर – र शहरातील फूटपाथ पुन्हा पादचाऱ्यांसाठी मोकळे करून देण्यासाठी आणि पादचारी हालचाली सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ६ मे ते १० मेदरम्यान ‘फूटपाथ फ्रीडम’ नावाची विशेष मोहीम राबवली. या पाच दिवसांच्या मोहिमेदरम्यान, शहरातील विविध विभागांमध्ये फूटपाथ अतिक्रमण करणाऱ्या २,२३३ जणांवर कारवाई करण्यात आली.
ही मोहीम १७ जानेवारी २०२५ पासून सुरू असलेल्या मोठ्या स्तरावरील कारवाईचा भाग आहे. या मोहिमेद्वारे मोटार वाहन कायदा कलम १२२ आणि १७७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १०२ आणि ११७ अंतर्गत अतिक्रमण व बेकायदेशीर पार्किंगविरोधात कार्यवाही केली जात आहे. आतापर्यंत एकूण ११,५४९ वाहनांवर फूटपाथवर पार्किंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे, तर २०,४४७ तात्पुरत्या अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली आहे.
फूटपाथ फ्रीडम मोहिमेदरम्यान सीताबर्डी विभागात सर्वाधिक म्हणजे ४६९ अतिक्रमणांवर कारवाई झाली, तर सदर विभागात ३४९ आणि सक्करदरा भागात २९६ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेदरम्यान एकूण ७३२ वाहने टो करण्यात आली, ५१७ तात्पुरत्या स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली आणि ९८४ प्रकरणांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई झाली.
या मोहिमेच्या यशाबद्दल बोलताना वाहतूक विभागाचे उपायुक्त अर्चित चांडक म्हणाले, “ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरूच राहणार आहे. नागरिकांनी वाहने ठरवून दिलेल्या जागेतच लावावीत आणि फूटपाथ अथवा रस्त्यांच्या कडेला तात्पुरते स्टॉल्स लावू नयेत. फूटपाथ हे पादचाऱ्यांसाठी आहेत. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक नियमांचे पालन अत्यावश्यक आहे.