Published On : Thu, Feb 18th, 2021

गुरुवारी चार मंगल कार्यालयांवर कारवाई

मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कामगिरी : ८८ सभागृहांची तपासणी

नागपूर : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. १८) शहरातील चार मंगल कार्यालयावर कारवाई केली आहे. प्रशासनाने लग्न समारंभासाठी जारी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपाद्वारे ही कारवाई करण्यात आली. शहरातील विविध झोन अंतर्गत चार मंगल कार्यालयावर झालेल्या कारवाईत ३५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. सोबतच दहाही झोनमधील ८८ सभागृहांची तपासणी करण्यात आली.

मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.


नेहरूनगर झोन अंतर्गत म्हाळगीनगर चौकातील बेसा पॉवर हाऊस जवळील एम्पोरियम हॉल, लकडगंज झोन अंतर्गत वर्धमान नगर येथील सातवचन लॉन, आसीनगर झोन अंतर्गत पॉवरग्रीड चौकातील जगत सेलिब्रेशन लॉन व मंगळवारी झोन अंतर्गत गोधनी रोडवरील गोविंद लॉन वर कारवाई करण्यात आली. सर्व झोनमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त व-हाडी आढळल्याने कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. यापैकी एम्पोरियम हॉल व जगत सेलिब्रेशन लॉनकडून प्रत्येकी १५ हजार रुपये दंड तात्काळ वसूल करण्यात आले.

तर वर्धमाननगर येथील सात वचन लॉन कार्यालय बंद असल्याने त्यांना १५ हजार रुपयांचे नोटीस बजावण्यात आले. तर गोधनी मार्गावरील गोविंद लॉनकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले. दिवसभरातील कारवाई अंतर्गत ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले.

याशिवाय लक्ष्मीनगर झोनमधील १०, धरमपेठ झोनमधील १४, हनुमाननगर झोनमधील ९, धंतोली झोनमधील ११, नेहरूनगर झोनमधील ९, गांधीबाग झोनमधील ५, सतरंजीपुरा झोनमधील ४, लकडगंज झोनमधील ८, आसीनगर झोनमधील ८, मंगळवारी झोनमधील १० असे एकूण ८८ मंगलकार्यालयांची तपासणी करण्यात आली.