Published On : Sat, Feb 1st, 2020

रस्ते, फुटपाथवर भरणा-या ४० बाजारांवर कारवाई

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार हटविले अतिक्रमण

नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय परिसरातील निर्धारित क्षेत्राबाहेरील ४० बाजारांवर शनिवारी (ता.१) सकाळी ७ वाजतापासून दिवसभर कारवाई करण्यात आली. मनपा क्षेत्राबाहेरील कारवाई करण्यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश जारी केले होते. त्यानुसार शनिवारी (ता.१) सर्व झोनचे सहायक आयुक्त, अतिक्रमण विभाग, उपद्रव शोध पथक, स्वच्छता विभाग, लोककर्म विभाग, सर्व झोनचे बाजार विभाग व सहाय्यक अधीक्षक यांच्या मार्फत संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली.

शहरात अनेक ठिकाणी दररोज किंवा आठवडी बाजार भरतात. मात्र मनपाने निर्धारित केलेल्या परिसराव्यतिरिक्त रस्त्यावर भाजी विक्रेते किंवा इतर अनधिकृतपणे व्यवसाय करणा-यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय नागरिकांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यासंबंधी महापौर संदीप जोशी यांच्या ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रम, तक्रार निवारण शिबिर, जनता दरबारमध्ये अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. यावर गांभीर्याने दखल घेत महापौरांनी अतिक्रमणासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली होती. समितीद्वारे वेळोवेळी बैठक घेउन चर्चा करून प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात काही नियम निर्धारित करून ते सभागृहापुढे सादर केले होते. सभागृहामध्ये सादर करण्यात आलेल्या नियमांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानुसार शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत महापौर संदीप जोशी यांनी निर्देश दिले होते.

अतिक्रमणसंदर्भात सभागृहामध्ये मंजुरी मिळाल्यानंतर निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांभीर्याने दखल घेत शनिवार (ता.१)पासून कारवाईला सुरूवात करण्याचे आदेश दिले. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील सर्व झोनमध्ये पथकाद्वारे ४० बाजारांमधील सुमारे २५०० विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. रविवारी (ता.२) सकाळी ७ वाजतापासून शहरातील इतर भागांमध्येही कारवाई करण्यात येणार आहे.

मनपा आयुक्तांच्या धडाकेबाज निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आहेत. रस्ते, फुटपाथवरील बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेकांचे अपघातही झाले आहेत. अनेकदा तक्रारी करून कोणतिही कार्यवाही होत नव्हती. मात्र आयुक्त तुकाराम मुंढे रूजू होताच सर्वच तक्रारींचे अगदी तात्काळ निराकरण करण्यात येत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करीत आयुक्तांचे आभार मानले.

या बाजारांवर झाली कारवाई
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवारी (ता.१) प्रतापनगर चौक, माटे चौक, त्रिमूर्ती नगर चौक, जयताळा, गोपाल नगर, गोकुळपेठ मार्केट, आशीर्वादनगर चौक, मानेवाडा, उदयनगर चौक, कॉटन मार्केट, रमना मारोती, म्हाळगी नगर, कमाल चौक, कबीर नगर, ताजनगर, चार खंबा चौक, गिट्टीखदान, गोरेवाडा, इटारसी पुलीया, महाल बुधवारा, आयचित मंदिर, मातृसेवा संघ, नटराज टॉकीज चौक, हिवरी नगर, निकालस मंदिर परिसर, हरीगंगा बिल्डींग, अमरदीप टॉकीज, बगदीया चौक, तीन नल चौक, मारवाडी चौक, जागनाथ बुधवारी, झाडे चौक, एच.बी.टाउन, भंडारा रोड, पारडी, जरीपटका, छावणी, काटोल रोड, मानकापूर, भरत चौक आदी ४० बाजारांवर कारवाई करण्यात आली.

…आणि पथकाला घेरले
अवैध बाजार व व्यावसाय करणा-यांवर अतिक्रमण कारवाई करताना नागरिकांनी कारवाईला विरोध दर्शविला व मनपाच्या पथकाला घेराव केला. गांधीबाग झोन येथील शनिवारी बाजार व हनुमाननगर झोनमधील उदयनगर येथील अवैध बाजार हटविण्यासाठी आलेल्या पथकाशी परिसरातील विक्रेत्यांनी बाचाबाची करीत घेराव दिला. बाजार हटविण्यासाठी किमान दोन दिवसाचा वेळ मिळण्याची मागणी यावेळी रस्ते, फुटपाथवर व्यवसाय करणा-यांनी केली. त्यानुसार दोन दिवसानंतर या दोन्ही ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे.