Published On : Tue, Mar 23rd, 2021

दहा हजार लसीकरणाचे लक्ष्य साध्य करा- जिल्हाधिकारी संदीप कदम

Advertisement

लसीकरणात जिल्हा प्रथम
54 हजार उद्दिष्ट साध्य

भंडारा:- 1 मार्च पासून जेष्ठ नागरीकांच्या लसीकरणास जिल्ह्यात सुरूवात झाली असून 45 ते 60 वर्ष वयोगटातील 1 लाख 64 हजार 464 नागरिकांच्या लसीकरणाचे जिल्ह्यास उद्दिष्ट असून 22 मार्चपर्यंत 54 हजार उद्दिष्ट साध्य झाले आहे. लसीकरणाची टक्केवारी 33 टक्के असून ज्येष्ठ नागरिक लसीकरण मोहिमेत भंडारा जिल्हा राज्यात पहिला आहे. जिल्ह्यात सध्या 8 हजार 900 प्रतिदिन लस देण्यात येतात. हे लक्ष्य दहा हजार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

कोविड लसीकरण कृती दलाची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर व कृती दलाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

कोविड या संसर्गजन्य आजारावर लस हाच योग्य पर्याय असून पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी केंद्रावर यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. लस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे लस घेतल्यानंतर कोरोनाचा गंभीर धोका टाळता येतो. रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यापासून ही लस दूर ठेवते.

जिल्हात आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिदिन 8 हजार 900 व्यक्तींचे लसीकरण करण्यात येते. लसीकरणाचा वेग वाढवून दर दिवशी दहा हजार लसीचे उद्दिष्ट साध्य करा अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. सध्या जिल्ह्यात लसीचे डोज उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर मिळून भंडारा जिल्ह्यात 19 हजार 154 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यात 10595 आरोग्य कर्मचारी व 8559 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तूमसर, उपजिल्हा रुग्णालय साकोली, ग्रामीण रुग्णालय लाखनी, ग्रामीण रुग्णालय पवनी, ग्रामीण रुग्णालय मोहाडी, व ग्रामीण रुग्णालय लाखांदूर, ग्रामीण रुग्णालय पालांदूर, ऑर्डन्स फॅक्टरी, ग्रामीण रुग्णालय अड्याळ, ग्रामीण रुग्णालय सिहोरा, प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रायव्हेट हॉस्पिटल येथे लसीकरण केंद्र आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी आरोग्य विभाग नियोजन करत आहे.

नियमित कोविड लसीकरणा अंतर्गत आतापर्यंत 8 हजार 722 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोज देण्यात आला असून दुसरा डोज घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 6 हजार 50 एवढी आहे तर 5 हजार 251 फ्रंटलाईन वर्करनी कोवीड लसीचा पहिला डोज घेतला आहे. दुसरा डोज घेणाऱ्यांची संख्या 1 हजार 751 एवढी आहे.