Published On : Mon, May 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आरोपी प्रिन्स तुलीचा आंबाझरी पोलीस स्टेशनमधला फोटो व्हायरल ; व्हीआयपी अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा

Advertisement

नागपूर : शहरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल व्यवसायी प्रिंस तुली यास अंबाझरी पोलिसांनी मुंबईतून अटक केली. प्रिंस तुली याने १६ मे रोजी तक्रारकर्त्या महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली होती. महिलेशी अनुचित व्यवहार केला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. हे सारे सोशल मीडियावर पोस्ट केल्याने महिलेने थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर विनयभंग, शिवीगाळ व धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांनी त्याला अटक केल्यानंतर तुली याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने रविवारी सुट्टी असल्याने एक दिवसाची वाढ केली. त्यानंतर आज प्रिन्स तुलीचा पोलीस स्टेशनमधील फोटो व्हायरल झाला असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

या फोटोमध्ये तो बिंदास्तपणे अंबाझरी पोलीस स्टेशनच्या बाकावर बसलेला दिसत असून त्याच्या हातात एनर्जी ड्रिंकची एक बॉटल दिसत आहे. यातून तुलीच्या लग्जरी लाईफचा अंदाज दिसून आल्याचे दिसते. गळ्यात काळा दुपट्टा, डोक्यावर टोपी, जॅकेटमध्ये प्रिन्स तुली पोलीस स्टेशनमध्ये बसलेला आहे.यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर गुन्हेगारीचा कोणताच भाव दिसत नाही.

Advertisement

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोसंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना विचारले असता हा फोटो पोलीस स्टेशनमधला असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.

प्रिन्स तुलीच्या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी अहिर यांनीही तुलीच्या व्हायरल झालेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली. प्रिन्स तुलीला अटक केल्यापासून तो मानसिक तणावात गेला आहे. त्याने आतापर्यंत जेवण केले नसून वॉशरूमलाही तो गेला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फोटोमध्ये प्रिन्स तुलीच्या हातात दिसत असलेली बॉटल ही एनर्जी ड्रिंकची नसून पाण्याची बॉटल असल्याचे ते म्हणले.