नागपूर : तहसील पोलिसांनी टिमकी, भानखेडा भागात गस्तीदरम्यान एका ३४ वर्षीय इसमाला ७.२६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडरसह अटक केली. पकडलेल्या आरोपीचे नाव शकील अहमद अब्दुल खालिद असे असून तो टाकिया दीवानशाह, लाल शाळेजवळ राहणारा आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे ७२,६०० रुपये आहे.
ही कारवाई गुरुवारी पहाटे २:१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, गुप्ता आटा चक्कीजवळ एक इसम अंमली पदार्थ घेऊन फिरत आहे. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी त्या इसमाचा पाठलाग करून त्याला पकडले. झडती घेतली असता त्याच्या उजव्या पँटच्या खिशात झिप लॉक पिशवीत एमडी पावडर सापडली.
पोलिसांनी आरोपीकडून एमडी पावडर, मोबाईल फोन आणि नंबर नसलेली सुझुकी बर्गमन दुचाकी असा एकूण १.५२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २१(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, अपर आयुक्त संजय पाटील (गुन्हे), डीसीपी महेक स्वामी आणि एसीपी अनीता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पीआय शुभांगी देशमुख, पीएसआय रसूल शेख, तसेच राजेश ठाकूर, रामकैलास यादव, युनुस खान आणि फिरोज खान यांचा समावेश होता.