Published On : Mon, Nov 26th, 2018

संविधानाने दिलेल्या हक्कासोबत आपल्या कर्तव्याप्रती जागृती आवश्यक – अश्विन मुदगल

संविधान दिनानिमित्त संविधान गौरव रॅली स्पर्धा
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन

नागपूर: भारतीय संविधानाने सर्व जाती धर्माच्या नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. संविधानाने दिलेल्या हक्कासोबतच आपल्या कर्तव्यासंबंधी जागृत राहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान गौरव कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा इंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, नागालँडचे भारतीय पोलीस सेवेचे संदीप तामगाडगे, डॉ.आंबेडकर थॉटचे प्रमुख डॉ.प्रदीप आगलावे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती सुकेशिनी तेलगोटे, श्रीमती शारदा राजकुमार बडोले, पोस्ट मास्टर जनरल धम्मज्योती गजभिये, भंदन्त नागदीपंकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संविधान कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर संविधान रॅलीला प्रारंभ झाला.

भारतीय संविधानाबाबत जागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यादृष्टीने संविधान दिन साजरा करण्यात येतो. उद्देशिका हा संविधानाचा आरसा असल्याचे सांगतांना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले. विद्यार्थी दशेपासूनच संविधानाचे संस्कार रुजविण्यासाठी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. घटनेने भारतीय नागरिकाला अकरा मुलभूत अधिकार दिले आहेत. त्यामध्ये शिक्षणाचा अधिकाराचा समावेश आहे.

संविधान हे परिवर्तनाचे साधन असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या विकासासोबतच प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माप्रमाणे आचारण्याचा अधिकार दिला आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकांना कलम 32 नुसार घटनेने दिले आहे. समता, स्वातंत्र व बंधुता हे संविधानाच्या माध्यमातून दिल्यामुळे जगामध्ये भारतीय लोकशाहीची समृद्ध परंपरा आजही कायम आहे. संविधानाप्रती सर्वांनीच आदर राखून त्यानुसार कृतीत आणण्याच्या दृष्टीने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

‘भारतीय संविधान संस्कृती, विविधेतत एकता’ या विषयावर संविधान गौरव रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध वेशभूषा, फलके, चित्ररथ, लेझीम पथक घेऊन रॅली सामाजिक भवन ते संविधान चौक येथे मार्गस्थ झाली. रॅलीमध्ये शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, वसतीगृहाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, समाज कल्याण महाविद्यालयाचे कर्मचारी, विद्यार्थी, विविध संस्था, संघटनेचे अधिकारी उपस्थित होते. संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन संविधान गौरव रॅलीचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल श्रीरामे तर आभार सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी मानले.