Published On : Mon, Jul 29th, 2019

कार पलटी होवून ग्राम पंचायत सदस्याचा अपघाती मृत्यू

रामटेक : स्विफ्ट कारचे समोरील टायर फुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक शीतलवाडी ग्राम पंचायत सदस्य राजकुमार मारोती मसराम वय २५ हल्ली राहणार शितलवाडी रामटेक याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच रात्री ९ वाजताचे दरम्यान रामटेक-मौदा रस्त्यावर नगरधन जवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार शुक्रवारच्या रात्री अंदाजे ९ वजताचे दरम्यान काही कामानिमित्त राजकुमार मसराम हा स्विफ्ट डिझायनर गाडीने रामटेक वरून मौदयाकडे एकटाच जात असतांना नगरधन ते मौदा रस्त्यावर नगरधन गावाच्या जवळ एका राईस मिल समोरून जात असतांना अचानक स्विफ्ट गाडीचे समोरील उजव्या बाजूचे टायर फुटल्याने कार पलटी झाली.

या झालेल्या अपघातात राजकुमार मसराम याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला. त्याचे डोक्याला मार लागल्याने रक्त स्राव झाला होता.राजकुमार हा गेल्या दहा वर्षांपासून आई-वडील व बहिणी सोबत शितलवाडी रामटेक येथे राहत होता.

त्याच्या या एकाएकी झालेल्या अपघाती निधनामुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांचे मार्गदर्शनात पोलीस तपास सुरु आहे .