Published On : Sat, Jun 30th, 2018

शिवाजी महाराजांच्या अनुकरणासाठी सेवेचे व्रत स्वीकारा : ना. नितीन गडकरी

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांना यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवान जाणता राजा असे संबोधले जाते. पिता कसा असावा, राजा कसा असावा याचे आदर्श उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज होय. या देशाचे पहिले धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा राजाचे अनुकरण करायचे असेल तर आयुष्यात सेवेचे व्रत स्वीकारा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने यशोधरा नगर पोलिस ठाण्याजवळ योगी अरविंदनगर परिसरातील शिवाजी चौकात तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती म्यूरल प्रतिमेचे लोकार्पण आज शनिवारी (ता. ३०) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, मनपातील बसपाचे पक्षनेते मो. जमाल, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, संदीप जाधव, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका भाग्यश्री कानतोडे, सुषमा चौधरी, निरंजना पाटील, नसीम बानो इब्राहिम खान, प्रमिला मंथरानी, नगरसेवक शेषराव गोतमारे, संजय चावरे, परसराम मानवटकर, डॉ. विंकी रुग्वानी, भाजपचे महामंत्री गणेश कानतोडे, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, दिलीप गौर, माजी नगरसेवक प्रभाकर येवले, मो. इब्राहिम, रमेश वानखेडे,बंडू पारवे, संजय चौधरी, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, सर्व धर्माचा सन्मान करणे, जात, धर्म, पंथ याही उपर जाऊन विचार करणे, ही आमची संस्कृती आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही केंद्रात आणि राज्यात काम करीत आहोत. शोषित, वंचितांसाठी समाजातील दुर्बल घटकासाठी काम करीत आहोत म्हणूनच लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला. नागपूरकर जनतेने निवडून दिल्यामुळे आज देशभरात रस्त्याचे जाळे तयार करीत आहोत. नागपूरच्या भविष्यासाठी मेट्रोचे काम करीत आहोत. नागपूर शहराचा वेगाने कायापालट होत आहे.

हे करीत असताना या भागातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ देताना समाधान वाटते. मी सेवा कार्यालाच राजकारण मानतो. सहा हजारांपेक्षा अधिक लोकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया, सुमारे एक लाख महिलांची स्तन कर्करोग तपासणी, त्यातील कर्करोग आढळून आलेल्या दोन हजार महिलांवर उपचार, देशभरातील १० करोड महिलांना गॅस कनेक्शन, नागपुरातील एक लाख २० हजार महिलांना त्याचा लाभ, हे सर्व करताना आनंद वाटतो. यातून वेगळे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्धा, भंडारापर्यंत ब्रॉडगेज मेट्रो

नागपूरचा झपाट्याने विकास होत असताना नागपूरजवळील शहरे मेट्रोने जोडण्याचा मानस असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी म्हटले. लवकरच नागपूर-वर्धा, नागपूर-भंडारा, रामटेक-काटोल ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. वर्धा-नागपूर एसी मेट्रोमध्ये केवळ अर्धा तासात कापणे भविष्यात शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गरीबांना फर्निचरयुक्त घरे

नागपूर जिल्ह्यातील गरिबांना पंतप्रधान आवास योजनेतून ५० हजार घरे देण्याचा संकल्प आहे. त्यापैकी आठ हजार घरांचे काम सुरू आहे. या घरांमध्ये डबल बेड, सोफासेट राहणार असून सोलर हिटर आणि मोफत वीज देण्याचेही प्रस्तावित आहे. केवळ साडे तीन ते चार लाख रुपयांत ही घरे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ५२ एकर जागेवर १० हजार घरांची निर्मिती सुरू होणार असल्याचा उल्लेखही ना. नितीन गडकरी यांनी केला.

प्रदुषणमुक्त, प्लास्टिकमुक्त नागपूर

नागपूर हे आपले घर आहे अशी मानसिकता जोपर्यंत बनणार नाही तोपर्यंत नागपूर स्वच्छ होणार नाही. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेल्या नागपुरातील प्रत्येक व्यक्ती स्मार्ट व्हायला हवा. अर्थातच प्लास्टिकबंदी, शून्य प्रदूषण करायचे असेल तर आता प्रत्येक व्यक्तीने या मोहिमेत योगदान द्यायला हवे. कचरा कचरापेटीतच टाका. कचऱ्याचे विलगीकरण करा, प्लास्टिक वापरू नका, असा संदेश ना. गडकरी यांनी दिला.

जरीपटका पुलासाठी ६५ कोटी

देशात रस्ते बांधत असताना नागपूर महानगरपालिकेलाही आपण पैसा देत असल्याचे त्यांनी सांगितले. कालच नागपूरसाठी पुन्हा ७०० कोटी आणल्याचा उल्लेख करीत जरिपटका पुलासाठी ६५ कोटी मंजूर केल्याचे ना. नितीन गडकरी यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

देखण्या पूर्णाकृती म्यूरलचे लोकार्पण

प्रारंभी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते देखण्या, अप्रतिम राजे शिवछत्रपती यांच्या पूर्णाकृती म्यूरल प्रतिमेचे लोकार्पण करण्यात आले. तुतारी, ढोल, ताशे आदींच्या गजरात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी महाराजांना अभिवादन केले. नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शिवस्मारक उत्सव समितीने सहकार्य केले. लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. मिलिंद माने यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाजपचे महामंत्री गणेश कानतोडे यांनी केले. संचालन महेश संगेवार यांनी केले. आभार नंदू कावळे यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.