Published On : Wed, Jul 1st, 2026
By Nagpur Today Nagpur News

गणेशपेठ पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात; 3 हजारांची लाच स्वीकारताना अटक!

Advertisement

नागपूर : नागपुरात भ्रष्टाचारविरोधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आणखी एक धडक कारवाई केली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हेड कॉन्स्टेबलला 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली. विमा दाव्यासाठी (इन्शुरन्स क्लेम) आवश्यक असलेली आरोपपत्राची (चार्जशीट) प्रमाणित प्रत देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशीष निकोडे (वय 47) असे अटक करण्यात आलेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असून, बसस्थानक परिसरात सापळा रचून एसीबीने त्यांना अटक केली.

तक्रारदार हे देखील पोलीस विभागात कार्यरत असून त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात आहे. निवडणूक बंदोबस्ताच्या ड्युटीदरम्यान कारच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. या अपघाताची नोंद गणेशपेठ पोलीस ठाण्यात झाली होती आणि त्या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल आशीष निकोडे यांच्याकडे होता.

अपघातानंतर विमा दावा दाखल करण्यासाठी तक्रारदारांना चार्जशीटची प्रमाणित प्रत आवश्यक होती. मात्र, ही प्रत उपलब्ध करून देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. चर्चेनंतर ही रक्कम 3 हजार रुपयांवर ठरली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आशीष निकोडे यांना रंगेहाथ पकडले.

Advertisement

या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.