Published On : Fri, May 11th, 2018

तंत्र शिक्षण मंडळाची शैक्षणिक प्रमाणपत्रे आता ऑनलाईन

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व पदविका प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांची अंदाजे 9 लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजिटल पद्धतीने नोंदणी करुन जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.विनोद म. मोहितकर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडच्या अंतर्गत कार्यरत सीडीएसएल व्हेंचर लिमिटेडचे कार्यकारी संचालक तथा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जॉयदिप दत्ता यांच्यात शैक्षणिक प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबतचा हा सामंजस्य करार झाला.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्या डिजिटल इंडियाच्या धोरणानुसार, ही नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजिटल पद्धतीने नोंदणी करुन जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. प्रमाणपत्रातील माहितीची सत्यता, सचोटी, गोपनीयता व सुरक्षतेची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. या सेवेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्राची डिजिटल अथवा प्रिंटेड कॉपी विनासायास उपलब्ध होईल. तसेच सर्व संबंधित भागधारक व सत्यापकांना राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीमार्फत विद्यार्थ्यांच्या संमतीने ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रमाणपत्रांची सत्यता तात्काळ पडताळून पाहणे शक्य होणार आहे.

यावेळी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय विकास योगेश कुंदनानी, राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्या प्रमुख ॲमी श्रॉफ, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे प्रधान सचिव वि. र. जाधव, उपसचिव डॉ. चं.डि.कापसे व सहाय्यक सचिव आ. शि. आबक उपस्थित होते.