Published On : Fri, Jul 12th, 2019

ॲड. संजय बालपांडे यांनी स्वीकारला विधी व विद्युत समितीचा कार्यभार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती म्हणून ॲड. संजय बालपांडे यांनी पदभार स्वीकारला. मावळते सभापती लहुकुमार बेहते यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला.

पदग्रहण समारंभाचे आयोजन मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात शुक्रवारी (ता. १२) करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर दीपराज पार्डीकर उपस्थित होते. मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, समितीचे उपसभापती निशांत गांधी, प्रतोद दिव्या धुरडे, मावळते सभापती लहुकुमार बेहते, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अग्निशमन व विद्युत समितीचे सदस्य संदीप गवई, वनिता दांडेकर, भारती बुंडे, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या उपसभापती उषा पॅलट, नगरसेवक संजय महाजन, भाजपचे नागपूर शहर संपर्क प्रमुख विलास त्रिवेदी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस.मानकर आदी उपस्थित होते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना उपमहापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, अग्निशमन विभागाचे कार्य जोखमीचे कार्य आहे आणि विद्युत विभागाचे कार्य शहर प्रकाशात ठेवण्याचे आहे. दोन्ही विभागाचे कार्य आव्हानात्मक आहे. सभापती संजय बालपांडे हे कुठल्याही आव्हानांना सामोरे जाण्यास सदैव तत्पर असतात. त्यांच्या कार्यकाळात हे दोन्ही विभाग कार्याची नवी उंची गाठतील. मनपातील सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार विकास कुंभारे यांनी ॲड. संजय बालपांडे यांच्या अनुभवाचा उल्लेख केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी श्री. बालपांडे यांनी केलेले कार्य मोठे आहे. वकील असल्यामुळे राजकीय आंदोलनात त्यांची नेहमी सोबत मिळाली. त्यांच्या या अनुभवाचा फायदा समितीच्या माध्यमातून विभागाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे आणि मावळते सभापती लहुकुमार बेहते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करीत ॲड. संजय बालपांडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या कार्यकाळात उर्वरीत कामे पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नवनिर्वाचित सभापती ॲड. संजय बालपांडे म्हणाले, जी जबाबदारी आपणास मिळाली आहे ती कर्तव्यनिष्ठेने पार पाडीन. पक्षनेतृत्वाने आपणावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवीन. कर्मचाऱ्यांचा प्रश्न अग्निशमन विभागात सर्वात मोठा आहे. त्यामुळे या विभागासाठी नवे धोरण तयार करावे लागेल. अग्निशमन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत त्यांची सेवा घेता येईल का, यादृष्टीने पुढे विचार करु. विभागातील कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ, असा विश्वास त्यांनी दिला.

नवनिर्वाचित सभापती ॲड. संजय बालपांडे यांचे सर्व मान्यवरांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रतोद दिव्या धुरडे यांनी केले.