नागपूर : झिल्पी तलावाजवळ फिरायला गेलेल्या विद्यार्थ्याला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण आपल्या मत्रिणीसोबत याठिकाणी फिरायला आला होता. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हा विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो गुरुवारी सकाळी १० वाजता मैत्रिणीसोबत कुणालाही काहीच न सांगता फिरायला आला .
दोघेही दुचाकी नेझिल्पी तलावाजवळ गेले. दोघेही तलावाच्या काठी एकांतात बसले असताना तीन अज्ञात आरोपी तेथे आले व येथे बसण्याची परवानगी नाही असे म्हणत दटावू लागले. तुम्ही नियम तोडले आहेत, असे म्हणून त्यांनी विद्यार्थ्याला पैसे मागितले. त्यांनी शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपींनी जबदरस्तीने विद्यार्थ्याचे पाकिट, घड्याळ हिसकले. त्यानंतर त्याठिकाणाहून पळ काढला. त्या विद्यार्थ्याने हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.